* स्नॅपडील’वरून दिवाळीत बाजारवापसी * नेस्लेचा ऑनलाईन फ्लॅश सेल
१०० शहरांत विक्री ३०० वितरकांकडे नवी पाकिटे विक्रीसाठी
नेस्ले इंडियाचे मॅगी नूडल्स हे उत्पादन अखेर परत बाजारात आले आहे. मॅगीमध्ये शिसे व मोनो सोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक आढळल्याने त्यावर जूनमध्ये बंदी घालण्यात आली होती. ऑनलाईनवर स्नॅपडीलमार्फत १२ नोव्हेंबरपासून मॅगीची विक्री केली जाणार असून आता ई व्यापाराचा मार्ग नेस्लेने अवलंबला आहे.
नेमकी किती पाकिटे ऑनलाईन विक्रीस ठेवणार हे समजलेले नाही. हा फ्लॅश सेल असणार आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने उत्पादन करून त्याच्या चाचण्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मॅगीला उत्पादन विकण्यास संधी मिळाली आहे. कारण या चाचण्या सुरक्षित आढळल्यास विक्री करायला हरकत नाही असे न्यायालयाने म्हटले होते. मॅगीवरील बंदीमुळे नेस्ले इंडियाला ५३० कोटी रुपयांचा फटका बसला होता व एफएसएसएआय या संस्थेने मॅगीवर खटला भरण्याची शक्यता वर्तवली होती. नेस्ले इंडियाचे अध्यक्ष सुरेश नारायणन यांनी सांगितले, की मॅगीची विक्री १०० शहरांत सुरू केली असून, ३०० वितरकांना मॅगीची नवी पाकिटे विक्रीसाठी दिली आहेत. लवकरच देशभरात विक्री सुरू होईल.
‘गेल्या दोन महिन्यांत आम्ही मोठय़ा संकटातून गेलो आहोत. त्यानंतर आमचा दर्जा, सुरक्षा व विश्वासार्हता आता परत मिळाली आहे. मॅगीच्या सरकार मान्यताप्राप्त तीनही प्रयोगशाळांत चाचण्यात आक्षेपार्ह काही आढळलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी ऑगस्टमध्ये उठवली होती. जूनमध्ये कंपनीने नूडल्स बाजारातून माघारी घेतल्या होत्या. नेस्ले इंडियाने एफएसएसएआयच्या आदेशास तसेच महाराष्ट्र एफडीएच्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरकारनेही नेस्ले इंडियाकडे अनधिकृत व्यापार पद्धतींमुळे ६४० कोटी रुपयांची भरपाई मागितली होती. सध्या तरी आम्ही मॅगी उत्पादन पुन्हा उभे करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत,’ असे नारायणन यांनी सांगितले.
नेस्लेवर विशेष खटला चालवणार असल्याबाबत त्यांनी सांगितले, की आमचा कारभार पारदर्शक आहे. जे काही घडले ते दुर्दैवी आहे, पण या खटल्यात आम्ही आमची बाजू मांडू, यात शंका नाही. चाचण्या करा सांगितले तेव्हा आम्ही त्या केल्या. आम्हाला काहीच लपवायचे नाही.

Story img Loader