ग्राहकांना अधिक दर्जेदार व भेसळविरहित दूध वितरीत करण्याच्या ध्यासाने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघानेही अत्याधुनिक ट्रेटा पँकिंग प्रणालीच्या अंगिकाराचा निर्णय घेतला आहे. महासंघाच्या मुंबईतील गोरेगावस्थित महानंद दुग्धशाळेत त्यासाठी प्रतिदिन ३५ हजार लिटर उत्पादन क्षमता असलेल्या सुमारे २१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक असेप्टिक डेअरी प्रकल्पही उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे शुक्रवारी, १५ फेब्रुवारील केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत असून, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती अपेक्षित आहे.
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय विकास योजना (आरकेव्हीवाय) यांच्या आर्थिक सहकार्याने महानंद दुग्धशाळेने हा आधुनिक प्रकल्प उभारला आहे. सध्या मुंबई व उपनगराबरोबरच, नागपूर, पुणे, लातूर, कुडाळ व गोवा या शहरांमधून महानंदच्या प्रतिदिन साडेपाच लाख लिटर दूधाची विक्री करण्यात येते. पहिल्या टप्प्यात टेट्राफिनो या पॅकिंगमध्ये र्निजतुकीकरण केलेल दूध ग्राहकास उपलब्ध करून दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात टेट्राब्रिक उत्पादने विक्रीस आणली जाणार आहेत.
सहा स्तरीय आवेष्टन असलेले हे पॅकिंग भेसळीस प्रतिबंधक आहेच, शिवाय रेफ्रिजरेशनशिवाय अशा दूधाला सामान्य तापमानात तीन महिन्यांपर्यंत टिकवून ठेवता येते अथवा त्याचा साठा करता येते. सध्या बाजारात उपलब्ध टेट्रा पॅकिंगमधील दूधापेक्षा किमतीच्या तुलनेत महानंदचे हे दूध स्वस्त असेल आणि मध्यमवर्गीय ग्राहक याचे आरोग्यविषयक फायदे विचारात घेऊन या दुधाकडे वळतील, असा विश्वास दूध महासंघाच्या अध्यक्षा वैशालीताई नागवडे यांनी व्यक्त केला.