टाटा, मर्सिडिझ बेन्झ, बॉश या जर्मन कंपन्या, श्री उत्तम स्टील अॅण्ड पॉवर अशा विविध ३२ कंपन्यांशी सामंजस्य करार, तब्बल २३,८४२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा वायदा आणि सुमारे २०,१९७ लोकांना थेट रोजगारनिर्मितीची अपेक्षा.. गुंतवणूकदारांसाठी नंदनवन असलेले उद्योगदृष्टय़ा देशातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची हरवलेली रया पुन्हा मिळवून देणाऱ्या प्रकल्प गुंतवणुकांची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे केली.
राज्यात येऊ घातलेली सर्वात मोठी गुंतवणूक ही पोलाद क्षेत्रातून आहे. श्री उत्तम स्टील अॅण्ड पॉवरने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रतिवर्ष १५ लाख टन क्षमतेचा पोलादनिर्मिती प्रकल्प आणि सोबत ४० मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प स्थापण्याचा सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पावर एकंदर ११,१५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा कंपनीचा मानस आहे. या केवळ एका प्रकल्पातून २,५०० जणांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील असा दावा करण्यात आला आहे.
ही सर्व गुंतवणूक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या माध्यमातून होऊ घातली आहे. मुख्यमंत्री चव्हाण आणि उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर तसेच राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्या उपस्थितीत, या सामंजस्य करारावर उद्योग सचिव अपूर्व चंद्र आणि प्रकल्प गुंतवणूक प्रस्तावित करणाऱ्या कंपन्यांचे मुख्याधिकारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
निवडणुकीची तयारी
‘महाशिवरात्री निमित्त’ सार्वजनिक सुट्टी असतानाही हा उद्योगांशी हा सामंजस्य करार करण्याचा सरकारी कार्यक्रम घाईने उरकण्यात आला. लोकसभा निवडणुकांची अधिसूचना निघून आचारसंहिता लागू होण्याच्या आत राज्य सरकारने ही गुंतवणूक आकर्षणातील सरशी सिद्ध करून आगामी निवडणुकीसाठी सज्जताच केली आहे.
प्रकल्प आणि गुंतवणुका
गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आलेले प्रमुख प्रकल्प, त्यांचे उद्योगक्षेत्र, गुंतवणूक आणि ठिकाणांसह..
श्री उत्तम स्टील अॅण्ड पॉवर (पोलाद व वीजनिर्मिती) ११,१५६ कोटी, सिंधुदुर्ग
मर्सीडिझ बेन्झ (वाहन उद्योग) १५०० कोटी, चाकण-पुणे
बॉश लिमिटेड (वाहनपूरक उद्योग) ७५३ कोटी, नाशिक
पर्किन्स इं. प्रा. लि. (डिझेल-गॅस इंजिन) ७५२ कोटी, शेंद्रा, औरंगाबाद</span>
एसीए हायजीन प्रॉडक्ट्स इंडिया (बाल-निगा उत्पादने) ६५० कोटी, पुणे
टाटा ऑटो कम्पोनंट (वाहन-पूरक उद्योग) ७०२ कोटी, नाशिक
न्यू हॉलंड फियाट (इं) लि. (ऊस कापणी यंत्र), ५५० कोटी, चाकण-पुणे
फिनेस ऑटो लि. (मशिनिंग प्रकल्प) ५५० कोटी, नांदूर, पुणे
फार्म कॉट फायबर प्रा. लि. (वस्त्रोद्योग) ५४८.१२ कोटी
सनफ्रेश अॅग्रो इंडस्ट्रीज (दुग्ध उत्पादने, वीज) ३९१ कोटी, अहमदनगर</span>
कॅन-पॅक इंडिया प्रा. लि. (पॅकेजिंग) ३८५ कोटी, गंगापूर- औरंगाबाद
नाम्को इंडस्ट्रीज प्रा. लि. (अभियांत्रिकी) ८५७.५१ कोटी, रायगड
इन्व्हेंटिस रिसर्च प्रा. लि. (जैव-औषधी) ३२५ कोटी, बुटिबोरी- नागपूर
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना (साखर) २५९ कोटी, कोल्हापूर</span>
अल्फा लाव्हल (इं.) लि. (फॅब्रिकेशन) २५६ कोटी खंडाळा, सातारा
बारामती अॅग्रो लि. (साखर व वीजनिर्मिती) १९७ कोटी, कन्नड-औरंगाबाद
सॅनस्टार लि. (रसायन) १९० कोटी, शिरपूर- धुळे
अर्जुन शुगर इंड. प्रा. लि. (साखर व वीजनिर्मिती), १६०.२५ कोटी, जालना
कलिका स्टील अलॉय्ज प्रा. लि. (टीएमटी बार), १२० कोटी, जालना
ओमसाईराम स्टील्स,अलॉय्ज प्रा. लि. (टीएमटी बार) ९८.५० कोटी, जालना
डेस्सन अॅग्रो टेक लि. (खाद्यउद्योग) ५० कोटी, धुळे
रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज् लि., (मद्य उद्योग), २५७ कोटी, औरंगाबाद