टाटा, मर्सिडिझ बेन्झ, बॉश या जर्मन कंपन्या, श्री उत्तम स्टील अॅण्ड पॉवर अशा विविध ३२ कंपन्यांशी सामंजस्य करार, तब्बल २३,८४२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा वायदा आणि सुमारे २०,१९७ लोकांना थेट रोजगारनिर्मितीची अपेक्षा.. गुंतवणूकदारांसाठी नंदनवन असलेले उद्योगदृष्टय़ा देशातील एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची हरवलेली रया पुन्हा मिळवून देणाऱ्या प्रकल्प गुंतवणुकांची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे केली.
राज्यात येऊ घातलेली सर्वात मोठी गुंतवणूक ही पोलाद क्षेत्रातून आहे. श्री उत्तम स्टील अॅण्ड पॉवरने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात प्रतिवर्ष १५ लाख टन क्षमतेचा पोलादनिर्मिती प्रकल्प आणि सोबत ४० मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प स्थापण्याचा सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पावर एकंदर ११,१५६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा कंपनीचा मानस आहे. या केवळ एका प्रकल्पातून २,५०० जणांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील असा दावा करण्यात आला आहे.
ही सर्व गुंतवणूक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या माध्यमातून होऊ घातली आहे. मुख्यमंत्री चव्हाण आणि उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर तसेच राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्या उपस्थितीत, या सामंजस्य करारावर उद्योग सचिव अपूर्व चंद्र आणि प्रकल्प गुंतवणूक प्रस्तावित करणाऱ्या कंपन्यांचे मुख्याधिकारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
निवडणुकीची तयारी
‘महाशिवरात्री निमित्त’ सार्वजनिक सुट्टी असतानाही हा उद्योगांशी हा सामंजस्य करार करण्याचा सरकारी कार्यक्रम घाईने उरकण्यात आला. लोकसभा निवडणुकांची अधिसूचना निघून आचारसंहिता लागू होण्याच्या आत राज्य सरकारने ही गुंतवणूक आकर्षणातील सरशी सिद्ध करून आगामी निवडणुकीसाठी सज्जताच केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा