भाग-पहिला
मागील काही स्तंभातून शेअर बाजार तसेच डिमॅट यांच्याशी निगडित असलेल्या संगणकीय सेवा याबाबत लिहिले. त्यावर अनेक वाचकांच्या ईमेलद्वारे प्रश्न/शंका आल्या आहेत. अनेक वाचक सलग सर्व लेख वाचत नसल्याने काही बाबी त्यांच्या वाचनात येत नाहीत. असो. मध्यंतरी (ट्रस्ट) TRUST या सेवेबाबत लिहिले होते. आपण शेअर्स विकले की डीपीकडे जाऊन डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप भरून द्यावी लागते. मात्र ते करण्याइतका वेळ आपणापाशी नसेल तर सरळ आपल्या ब्रोकरला पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी द्यावी म्हणजे तो ब्रोकर तुमच्या वतीने डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप भरून देईल. यातील धोका कमी करण्यासाठी Limited purpose पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी द्यावी जेणे करून जितके शेअर्स तुम्ही विकले असतील तितकेच शेअर्स ब्रोकर डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिपमध्ये लिहू शकतो, एकही शेअर जास्त नाही. ते देखील करायचे नसेल तरीं easiest   ही विनामूल्य सेवा वापरून घरबसल्या आपण आपली डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप इंटरनेटद्वारे नोंदवून शेअर्स आपल्या ब्रोकरच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित करू शकतो. आता काही जणांची तक्रार असते की आम्ही संगणकाशी तितके परिचित नाही, इंटरनेट वगरे आम्हाला जमत नाही!! इंटरनेटवर जाऊन विविध वेब साइट्स पाहण्यासाठी व्यक्तीला जितके जुजबी ज्ञान पुरेसे आहे तितके easiest  स्लिप नोंदवायला. असो. तर इतपतही ज्याला संगणकीय ज्ञान नाही त्यांच्यासाठी उपरोक्त TRUST   ही सोय आहे. आपण शेअर्स विकले (अर्थात स्टॉक एक्स्चेंजच्या ब्रोकरमार्फत) की त्यानंतर सीडीएसएलमधून आपणास एक एसएमएस संदेश येतो की अमुक इतके शेअर्स तुमच्या खात्यातून ब्रोकरच्या खात्यात हस्तांतरित होणे आहेत. तुमची संमती आहे का? या एसएमएसला तुम्ही होकार दिलात की सरळ तुमच्या डिमॅट खात्यातून तितके शेअर्स वजा होऊन ब्रोकरच्या डिमॅट खात्यात जमा होतील! नको ते डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप भरणे, नको ती पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देणे, नको ते easiest!! अर्थात ही सेवा हवी असेल तर एकदाच आपल्या ब्रोकरमार्फत डीपीकडे तशी नोंदणी केली पाहिजे इतकेच. दिवस अखेरीस आपण उपरोक्त एसएमएसला उत्तर दिले नाही तर नेहमीप्रमाणे डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप भरणे आवश्यक असेल.
काही वेळा व्याख्यानादरम्यान एखादा श्रोता असा काही प्रश्न विचारतो की, त्यातून अनेकांचे प्रबोधन होऊ शकते. नुकतेच कोल्हापूरला कमला महिला महाविद्यालयात एका प्राध्यापिकेने प्रश्न विचारला की, समजा सीडीएसएलकडून एसएमएस आला, एका तासाने मी त्याला उत्तर देणार आहे की माझी संमती आहे. या एक तासाच्या दरम्यान माझा मोबाइल घरातच कुठे तरी आहे पण सापडत नाही आणि मी तो शांत (silent)  करून ठेवला आहे. या परिस्थितीत दुसऱ्या फोनवरून रिंग देऊनही उपयोग होणार नाही. मग मी त्या एसएमएसला उत्तर तरी कसे देणार? कारण जो फोन डीपीकडे एकदा नोंदणी केलेला आहे त्याच फोनवरून उत्तर द्यावे लागते! ही अडचण मी सीडीएसएलच्या संगणक विभागाचे अधिकारी भूपेंद्र पटेल यांच्याकडे मांडली. त्यावर त्यानी सांगितले http://www.google.com/android/devicemanager या लिंकवर जाऊन काही औपचारिकता पूर्ण केल्यावर विशिष्ट पर्याय क्लिक केले की तुमच्या शांत स्थितीत असलेल्या मोबाइलवर देखील एक वेगळय़ा आवाजाची रिंग वाजते!! आणि मग तुमच्या मोबाइलचा ठावठिकाणा कळतो. या सेवेला काही पसे द्यावे लागत नाहीत. अनेक जणांना ही माहिती असण्याची शक्यता नाही म्हणून खास उल्लेख केला आहे. गमतीची गोष्ट म्हणजे पटेल हे केवळ संगणकतज्ज्ञ नसून उत्तम बुद्धिबळपटूदेखील आहेत. काही गुंतवणूकदार ‘ऑनलाइन ट्रेडिंग’ची सुविधा घ्यायला घाबरतात कारण आपला पासवर्ड कुणी चोरून वापरेल ही भीती. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की जो काही पासवर्ड आपण वापरीत असतो त्यात आणखी सहा आकडे टाइप करायला लागतात तरच डेटाबेसला प्रवेश मिळतो. अर्थात हे सहा आकडे कोणते ते सांगणारे एक छोटेखानी यंत्र असते. यूएसबीच्या आकाराचे हे उपकरण असते ज्यावरील उपरोक्त आकडे  दर ३० सेकंदानी बदलत असतात. जोवर हे यंत्र तुमच्या खिशात आहे तोवर भले तुमचा पासवर्ड कुणाला माहीत झाला असेल तरी तो वापरून डेटाबेसला प्रवेश करणे केवळ अशक्य असते. सावंतवाडी येथील व्याख्यानात एका शासकीय अधिकाऱ्याने सुंदर प्रश्न विचारला की, यंत्रावरील सहा आकडे पाहून मी ते लॉग इन करतेवेळी पासवर्डनंतर टाइप करता करता पाच आकडे टाइप केल्यानंतर सहावा आकडा टाइप करतेवेळीच सर्व आकडे बदलले (३० सेकंदाचा कालावधी पुरा झाला) तर काय होईल? नव्याने सर्व आकडे परत टाइप करायला लागतील का? खरोखरच हे यंत्र इतके शहाणे बाळ असते की नव्याने आकडे टाइप करायला लावीत नाही. कारण पूर्वीचे सहा आकडे कोणते होते ते लक्षात ठेवते आणि तेच स्वीकारते!! इतका छान प्रश्न विचारला म्हणून छोटेसे बक्षीस मी त्यांना देणार होतो पण कार्यक्रम संपण्याच्या आधी काही तातडीच्या कार्यालयीन कामासाठी त्यांना जावे लागले म्हणून ते राहून गेले. ते अधिकारी ‘लोकसत्ता’चे वाचक आहेत. त्यांनी हा लेख वाचताच जरूर माझ्याशी संपर्क करावा. ज्याची वस्तू त्याच्याकडे गेलेली बरी!
शेअर बाजारविषयक साक्षरता पसरविण्याच्या कामात अधिकाधिक संख्येने बँका पुढाकार घेत आहेत असे लिहिले होते. चांगल्या कामासाठी नेहमीच अनेकांचे सहकार्य मिळत असते. नुकतेच डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाचे सुधीर बडे यानी ग्रंथालयातर्फे मेडिकल, यांत्रिकी, कॉमर्स, कला, सीए, कंपनी सेक्रेटरी या विविध विषयाच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यासाठी शेअर बाजार आणि आर्थिक साक्षरता या विषयावर व्याख्यानांची मालिका आयोजित करण्याचा बेत कळविला आहे. शेवटी शेअर बाजार हा केवळ कॉमर्सच्या शाखेचा विषय नसून तो सर्वासाठी आहे.