चिनी गुंतवणूकदारांनी मेक इन इंडिया कार्यक्रमाचा लाभ घेऊन आमच्या देशात गुंतवणूक करावी. एकंदर वातावरण उद्योगास जास्त अनुकूल बनत आहे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी भारत-चीन व्यापार मंचाच्या बैठकीत दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमात केले.
मुखर्जी म्हणाले, भारतातील तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरेल याची काळजी आम्ही घेऊ. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विकासाकडे वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थांचा लाभ घेतला पाहिजे.
भारताच्या उत्पादनांना चीनमध्ये बाजारपेठ मिळाली, तर दोन्ही देशांतील व्यापार असमतोल दूर होण्यास मदत होईल असे सांगून प्रणब मुखर्जी म्हणाले, की औषधे, माहिती तंत्रज्ञान व त्यासंबंधीच्या सेवा तसेच कृषी उत्पादने या नैसर्गिक पूरक असलेल्या क्षेत्रात दोन्ही देश सहकार्य करू शकतात. दोन्ही दिशेने गुंतवणुकीचा ओघ असला पाहिजे. भारत व चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार इ.स. २००० मध्ये २.९१ अब्ज डॉलर्स होता तो गेल्या वर्षी ७१ अब्ज डॉलर्स झाला आहे. ग्वांगडाँग प्रांताची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलरची आहे तेथे उत्पादन व औद्योगिकरण जास्त असून ते चीनचे मोठे निर्यात केंद्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader