‘मेक इन इंडिया’ सप्ताहादरम्यान सर्वाधिक रकमेचे आणि संख्येच्या करारांचा विक्रम करणाऱ्या महाराष्ट्राने प्रत्यक्षात ६ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. या दरम्यान करण्यात आलेल्या करारांपैकी ७५ टक्के रक्कम नक्कीच प्रत्यक्षात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) वतीने आयोजित परिषदेदरम्यान देसाई बोलत होते.
केवळ महाराष्ट्र विषयावर वाहिलेल्या या चर्चात्मक परिषदेत संघटनेच्या महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुप बसू, पश्चिम विभागीय अध्यक्ष व किलरेस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक संजय किलरेस्कर तसेच संघटनेच्या पश्चिम व महाराष्ट्र विभागाचे अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.