पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या पहिल्यावहिल्या अमेरिकावारीस जाताना नरेंद्र मोदी यांनी भारताच्या उत्पादन क्षेत्रास चालना देणारे ‘मेक इन इंडिया’ अभियान जाहीर केले. भारताला उत्पादन क्षेत्राचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याची महत्त्वाकांक्षा स्पष्ट करतानाच उद्योगजगताला शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. देशातील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी कामगार कायद्यात सुधारणा करण्यात येतील, असे सुतोवाचही केले.
सध्या सुस्तावलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत चैतन्य आणण्यासाठी भारतातील अग्रगण्य उद्योजकांच्या उपस्थितीत मोदी यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या योजनेचे घट बसवले. या वेळी टाटा उद्योगसमूहाचे सायरस मिस्त्री, रिलायन्सचे मुकेश अंबानी, विप्रोचे अझीम प्रेमजी, कुमार मंगलम् बिर्ला, मारुती सुझुकीचे केनिची अयुकावा आणि लॉकहीड मार्टिनचे फिल शॉ आदी उद्योजक उपस्थित होते.
भारतातील उद्योगक्षेत्रासमोर असलेल्या समस्यांची मला जाणीव आहे. म्हणूनच पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर सध्या भर देण्यात आला आहे. भारतात डिजिटल जाळे विणण्याचा केंद्राचा प्रयत्न हा या समस्यांवरील उकलीचाच एक भाग आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
वस्तू, गाडय़ा, सॉफ्टवेअर, उपग्रह, पाणबुडय़ा, औषधनिर्मिती उद्योग, बंदरे, कागदनिर्मिती आणि ऊर्जा अशा सगळ्याच क्षेत्रांत आवश्यक त्या सुविधा उभारण्यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
हीच खरी ताकद..
आज जगातील कंपन्या आशिया खंडात येऊ पाहात आहेत, मात्र नेमकी कोणत्या देशात गुंतवणूक करायची याबाबत या देशांमध्ये संभ्रमावस्था आहे. भारत हा लोकशाही व्यवस्था, लोकसंख्येचे वैविध्य आणि प्रचंड मागणी असलेली बाजारपेठ असलेले आशियातील एकमेव राष्ट्र आहे. आणि हीच आपली ताकद आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. कोणत्याही व्यवसायाचा विस्तार करताना सर्वात मोठे आव्हान हे प्रशासकीय अडथळे दूर करण्याचे असते. केंद्र सरकारतर्फे तुम्हाला मी प्रभावी प्रशासनाची आणि गतिमान निर्णयांची हमी देतो, असे आश्वासन पंतप्रधानांनी उद्योजकांना दिले.
परराष्ट्र धोरणांतही बदल..
भारताचे ‘पूर्वेकडे पहा’ हे धोरण कायम राखताना ‘पश्चिमेला जोडा’ हे धोरणही यापुढे गरजेचे आहे आणि त्यासाठी जागतिक दृष्टीची गरज आहे, असे नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. नव्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘इन्व्हेस्ट इंडिया’ हे केंद्र सुरू करण्यात येणार असून, याच नावाने विशेष संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा