उत्सुकता ते बडय़ांच्या उपस्थितीचे आकर्षण
‘मेक इन इंडिया’ सप्ताहा दरम्यान गेल्या शनिवारपासून मुंबईत भरलेल्या प्रदर्शनाची गुरुवारी सांगता झाली.
वांद्रे – कुर्ला संकूलाच्या एमएमआरडीए मैदानावर आयोजित या प्रदर्शनातील भव्य दालने व चर्चासत्राच्या निमित्ताने राहिलेली बडे उद्योजक, राजकीय नेत्यांची एकगठ्ठा उपस्थिती हे या दरम्यान आकर्षण ठरले.
सप्ताहा दरम्यान गिरगाव चौपाटीवर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला लागलेले गालबोट प्रदर्शनस्थळीही चर्चेत होते. युरोपातील प्रमुख देश, बडय़ा कंपन्यांची स्वतंत्र दालने आणि त्याचबरोबर महागडी खान-पान सुविधा, सुरक्षिततेतील तारांबळ हे सारे यानिमित्ताने समोर आले. यानिमित्ताने अनेक राज्यांनी त्यांची व्यवसायपूरक धोरणे सादर केली.
१५.२० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ८.९० लाख भेटकर्त्यांची संख्या या मोजपट्टीत हे प्रदर्शन यशस्वी झाल्याचे मानले जाते. प्रदर्शनाचे यजमानपद भूषविणाऱ्या महाराष्ट्राच्या चर्चासत्रात एकाच मंचावर रतन टाटा, बाबा कल्याणी, दिलिप संघवी यांची उपस्थिती राज्याचे प्रतिनिधी असलेल्या केंद्रीय मंत्र्यांची हजेरी हे लक्षणीय ठरले.
युरोपातील तीन देशांचे स्वतंत्र दालन, राज्य दालनांमध्ये भाजपशासित व बिगर भाजपशासित राज्ये असा करण्यात आलेला भेदभाव, भाजपचे सरकार नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी फिरविलेली पाठ हेही लक्षवेधी ठरले. लक्षणीय गुंतवणुकीबाबत स्टर्लाइट, बीएई, ऑरेकल ट्रिव्ह्रिटॉन या विदेशी तर रेमंड, महिंद्र, मर्सिडिज बेन्झ, अदानी तसेच आरसीएफ, आयआरईडीएसारख्या शासकीय यंत्रणा चर्चेत राहिल्या.
आर्क रोबोट पुरस्कार मानकरी
‘मेक इन इंडिया’ सप्ताह प्रारंभीच नवउद्यमींसाठी जाहीर करण्यात आलेल्या सुमारे २ कोटी रुपयांच्या पुरस्कारासाठी आर्क रोबोट ही कंपनी मानकरी ठरली. वाटरहाऊस ऑटोमोशन क्षेत्रातील या कंपनीला भांडवलाच्या स्वरुपात ही रक्कम मिळणार आहे. क्वॉलकॉमने नवउद्यमींसाठी ही स्पर्धा घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरील जागतिक दर्जाचे बहुक्षेत्रीय प्रदर्शन यशस्वी झाले आहे. उद्योग, कंपन्याच मोठय़ा संख्येने एकमेकांशी जोडले गेले नाही तर सरकार-उद्योजक, प्रशासन ते नवउद्यमी यांचेही एक नवे नाते तयार झाले आहे.
– चंद्रजीत बॅनर्जी, महासंचालक, सीआयआय.

‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय बडय़ा कंपन्यांनाच प्रदर्शना दरम्यान स्थान मिळाले नाही तर स्थानिक कंपन्यांनाही जागतिक नेतृत्व करण्याचे निमित्त साधता आले आहे. आम्हीही महाराष्ट्राबरोबर दोन करार केले.
– संजय किलरेस्कर, पश्चिम क्षेत्र अध्यक्ष, सीआयआय.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make in india week epilogue