व्यवसाय करताना नीतिमूल्यांचा बोजा जड वाटला तरी तो सोबत घेऊन जायला हवा, तरच फळ गोड लागेल, असा संदेश विको लॅबचे अध्यक्ष गजानन पेंढारकर यांनी नवउद्योजकांना उद्देशून दिला. ‘बॉर्न टू विन’च्या पंधराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्यात, ‘उद्योगक्रमणा सहा दशकांची’ या विशेष कार्यक्रमात गजानन पेंढारकर यांनी विको लॅबरॅटरीजचा सहा दशकांचा प्रवास नवउद्योजकांना उलगडून दाखवला. यशवंतराव चव्हाण नाटय़संकुलात झालेल्या या मार्गदर्शनपर कार्यक्रमात पेंढारकरांनी आपल्या खुमासदार शैलीत संवाद साधून उपस्थितांची मने जिंकली. ‘धंदा कशाशी खातात हे माहीत नव्हतं. बालपण, बॅकबेंचर, फार्मसी अशा अनुभव अवस्थांतून गेल्याचा फायदा आपल्याला उद्योगात झाला. ‘विको’सारख्या उत्पादनाची निर्मिती करता आली. उत्पादन निर्माण करून ते यशस्वी होत नाही तर पॅकेजिंगही तितकेच महत्त्वाचे असते. जगातील पहिली आयुर्वेदिक टूथपेस्ट म्हणून आज ४० देशांत विको वज्रदंती विकली जाते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला मराठी व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष अनंत भालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Story img Loader