येत्या २४ व २५ नोव्हेंबर असे दोन दिवस दादर (पूर्व) येथील राजा शिवाजी विद्यालय येथे आयोजित ‘लक्ष्य २०२०’ या परिषदेत मराठी उद्योग पताकेच्या संपन्नता व श्रीमंतीचा कस लागणार आहे. राज्याच्या विविध विभागातून परिषदेला येऊ इच्छिणाऱ्यांचा आजवरचा वाढता प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
मराठी व्यावसायिक उद्योजक-व्यापारी मित्रमंडळाने आयोजित केलेल्या या परिषदेच्या दोन दिवसात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा-मार्गदर्शन होणार आहे. परिषदेसाठी प्रतिनिधींची नोंदणी सुरू झाली असून ‘www.marathivyapari.com’ या संकेतस्थळावरील वाढती वर्दळ परिषदेसंबंधी वाढत्या उत्सुकता दर्शविते, असे मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष अनंत भालेकर यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रांतच ‘थेट परदेशी गुंतवणूक’ विषयावरील चर्चेत जयराज साळगावकर (कार्यकारी संचालक, सुमंगल) आणि अ‍ॅड. नितीन पोतदार (पार्टनर, जे. सागर असोसिएट्स) सहभागी होत आहेत.
‘यशोगाथा’ या दुसऱ्या सत्रामध्ये मनोहर बिडये (झायकॉम इलेक्ट्रॉनिक्स), वर्षां सत्पाळकर (मैत्रेय ग्रुप), राजीव पाटील (महापौर, वसई-विरार महापालिका) आणि कमांडर अनिल सावे (अल्ट्राफार्मा) या यशस्वी उद्योजकांचे अनुभव कथन असेल. ‘अर्थपुरवठा’ या तिसऱ्या सत्रात उद्योग विकास केंद्राचे प्रादेशिक अधिकारी सुदाम नलावडे हे शासकीय योजनांची माहिती देतील. बँकांकाडून अर्थसहाय्य विषयावर सारस्वत बँकेचे उप-महाव्यवस्थापक अभिजीत प्रभू आणि व्हेंचर कॅपिटल या विषयावर जीएसएनए ग्लोबलच्या संचालिका आरती निमकर मार्गदर्शन करतील. ‘ब्रँडिंग’ हे शनिवारचे चौथे सत्र असेल.
दुसऱ्या दिवशी ‘जागतिक बाजारपेठ आणि मराठी उद्योजक’, ‘व्यवसाय नव्हे व्यवसायाची पद्धत बदला’, ‘जोडधंदा’, ‘सेवा उद्योग’ आणि ‘कृषी क्षेत्र : व्यवसाय संधी’ अशा वेगवेगळ्या सत्रांमध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. समारोपाच्या सत्रात ‘मगर पट्टा : व्यवसायाची नवी दिशा’ या विषयावर मगरपट्टा सिटीचे प्रमुख सतीश मगर मार्गदर्शन करतील.    

Story img Loader