मॅरिको लिमिटेडच्या संचालक मंडळाने व्यावसायिक तसेच संरचनात्मक पुनर्रचनेच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या नियोजनानुसार ग्राहकोपयोगी उत्पादन व्यवसायाला सशक्त बनविले जाण्याबरोबरच, त्वचेच्या निगेच्या ‘काया’ नाममुद्रेअंतर्गत येणाऱ्या व्यवसाय अंगासाठी ‘मॅरिको काया एंटरप्राइज लि.’नावाने स्वतंत्र कंपनी १ एप्रिल २०१३ पासून अस्तित्त्वात येईल.
नव्या दोन कंपन्यांपैकी ग्राहकोपयोगी उत्पादनाचे अंग सांभाळणाऱ्या मॅरिकोचे नेतृत्त्व हे सुगाता गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने करतील, तर कायाच्या निर्मितीपश्चात तिचे नेतृत्त्व सध्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय पाहत असलेले विजय सुब्रह्मण्यम यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने येईल.
या विभाजनाला आवश्यक त्या मंजुऱ्यांचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर, नंतर जाहीर होणाऱ्या रेकॉर्ड तारखेला (साधारण जून वा जुलै २०१३) असलेल्या मॅरिकोच्या भागधारकांना नवीन ‘मॅरिको काया’चे समभाग कंपनीकडून जाहीर होणाऱ्या विशिष्ट प्रमाणात दिले जातील. या समभागांचीही मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात नोंद केली जाईल आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून विभाजन प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाल्यानंतर दोन ते अडीच महिन्यात त्या समभागांमध्ये नियमित व्यवहार सुरू होणे अपेक्षित आहे. विदेशात विशेषत: आखाती देशात प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि दशकभरापूर्वी प्रस्तुत केल्या गेलेल्या ‘काया’ नाममुद्रेच्या उत्पादनांनी गेली सलग तीन वर्षे ‘सुपरब्रॅण्ड’ दर्जा मिळविला आहे.