संसदेत या ना त्या कारणाने गोंधळ-गदारोळाचे वातावरण मागल्या पानावरून पुढे याच चालीने कायम असले, तरी अर्थव्यवस्था आणि बाजारालाही बळ देणारे अनेक निर्णयांचा रेटा मात्र सरकारने कायम ठेवला आहे. किराणा व्यापारात थेट विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढीच्या निर्णयानंतर, बहुप्रतिक्षित भू-संपादन विधेयक मार्गी लागले आहे. या पुढे बँकिंग कायद्यात सुधारणा, विमा-पेन्शन सुधारणांची वाट अशीच मोकळी होऊ शकेल अशा शक्यता निर्माण झाल्या आहेत. त्याचे बाजारात अपेक्षित प्रतिसाद उमटतानाही दिसत आहेत. निफ्टी निर्देशांकाने यातून सहा हजाराचा अंशांचा उंबरा पार केल्यास नवल ठरणार नाही. तांत्रिकदृष्टय़ा बाजाराचा कल एकूण सकारात्मकच आहे.
चालू आठवडय़ात बाजारात सलग पाच दिवस घसरणीचे राहिले आहेत आणि अगदी मिड कॅप, स्मॉल कॅप समभागांमध्येही नफारूपी विक्री उलाढाली वाढलेल्या आहेत. तरी अशा समयी ‘व्हॅल्यू बाइंग’ अर्थात मूल्यात्मक खरेदी या संकल्पनेला सामान्य गुंतवणूकदारांनी खऱ्या अर्थाने समजून घेऊन, चोखंदळ व चलाख निर्णय घ्यायला हवा. सध्या वॉलमार्टच्या ‘लाचखोरी’ प्रकरणावरून बराच गहजब सुरू असला तरी, देशात रिटेल ब्रॅण्ड्समध्ये अगदी वॉलमार्टसह विदेशी गुंतवणूक येणार हे निश्चित आहे. शेअर बाजारातील या रिटेल शृंखलांचे भाव त्याची प्रचीती देतात. इतकेच नव्हे तर यातून वाणिज्य प्रकारची म्हणजे मॉल्स, वाणिज्य संकुलांच्या बांधकाम कंपन्यांनाही चांगले दिवस येऊ घातले आहेत. त्यामुळे आगामी २०१३ साल बऱ्याच काळ अडगळीत पडलेल्या स्थावर मालमत्ता कंपन्यांच्या शेअर्सच्या तेजीचे वर्ष ठरेल असे वाटते. ‘व्हॅल्यू बाइंग’साठी आरोग्यनिगा क्षेत्रातील डॉ. रेड्डीज लॅब, स्ट्राइड अर्कोलॅब, सिप्ला हे समभागही उत्तम वाटतात. याच संकल्पनेवर गेल्या आठवडय़ात या स्तंभात सुचविलेला मिंडा इंडस्ट्रीज रु. २३५ वरून रु. २८४ पर्यंत गेला. मदरसन सुमी सिस्टीम्सची वाढही दृष्ट लागण्याजोगी आहे. या शेअर्सप्रमाणे अगदी काही दिवसात भावात लक्षणीय वाढ दिसली नाही, तरी काही गुणात्मक शेअर्सचा पोर्टफोलियो बनविण्याचा सध्याचा सर्वोत्तम काळ आहे.
छोटे गुंतवणूकदार पुन्हा शेअर बाजाराकडे वळू लागले आहेत. चालू आर्थिक वर्षांच्या सहा महिन्यात नोंद झालेले जवळपास २० लाख गुंतवणूकदार हे बडय़ा शहरांबाहेरचे आहेत. वर्षांच्या शेवटच्या महिन्यात आलेल्या चांगल्या भागविक्री (आयपीओ)द्वारे त्यांच्या गुंतवणुकीचा कसही कदाचित आजमावला गेला असेल. पण आगामी वर्षांत अशा काही चांगल्या भागविक्रीचा त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा. शिवाय याच कारणासाठी सरकारने बनविलेल्या राजीव गांधी इक्विटी योजनेतून त्यांना आपल्या गुंतवणुकीचा श्रीगणेशा करता येईल.
आगामी आठवडय़ाचा कल हा बहुतांश तेजीकडे झुकणारा असेल. तरी खरेदीचा निर्णय हळूवार व सावधपणे घेतला जावा. दीर्घकालीन खरेदीसाठी टय़ूब इन्व्हेस्टमेंट आणि सन टेक रिअ‍ॅल्टी लि. हे समभाग चांगले वाटतात.

Story img Loader