निवडणुकीनंतर स्थिर सरकारच्या ‘आशे’ने भांडवली बाजारात गुंतवणुकीचा ओघ सुरू असून, निर्देशांकाची उच्चांकी उसळी आणि रुपयाच्या मूल्यात मजबूती येत असल्याचे प्रसारमाध्यमातील बाजार-विश्लेषकांच्या कयासांना फेटाळून लावत, अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी ही ‘आस’ नव्हे तर विद्यमान यूपीए सरकारच्या स्थिर कारभाराच्या ‘वास्तवा’ला दिली गेलेली पसंतीची पावती असल्याचे प्रतिपादन केले.
येथे आपले पुत्र आणि लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार कार्ती यांच्या प्रचारासाठी आले असता चिदम्बरम म्हणाले, ‘‘जर सध्या भांडवली बाजाराला चालना देणारी कोणतीही ‘आस’ असेल तर ती हीच की, नव्याने येणाऱ्या सरकारकडून माझ्या १७ फेब्रुवारी २०१४च्या अंतरिम अर्थसंकल्पात उल्लेख केलेला १० कलमी कार्यक्रम राबविला जाईल. जनसामान्य व गुंतवणूकदारांना मी खात्री देऊ शकतो की, काँग्रेसप्रणीत सरकारच या १० कलमी कार्यक्रमाची प्रामाणिक अंमलबजावणी करू शकेल.’’