ऐन दिवाळीत शेअर बाजार हा उदासवाणा आणि सुनासुनाच राहिला.. हे विधान पुरते सत्य म्हणता येणार नाही. लक्ष्मीपूजनानंतर शेअर बाजाराचे नवे वर्ष (सवंत २०६९) सुरू झाले. तेव्हापासून प्रमुख निर्देशांकांनी सलग तिसऱ्या दिवशी घसरण दाखविली हे खरेच. परंतु त्याच वेळी अनेक मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप धाटणीच्या शेअर्सच्या भावांनी जोरदार आतषबाजी करीत अस्मान गाठले आहे हे विसरून चालणार नाही. अर्थात ही स्थिती कायम राहणार नाही, स्मॉल कॅप, मिड कॅप शेअर्समधील भाववाढही विश्रांती घेईल आणि तेथेही मग प्रॉफिट बुकिंग सुरू होईल.
देशांतर्गत औद्योगिक उत्पादन दर, महागाई दर यांचे आकडय़ांमधील भयानकता उत्तरोत्तर वाढतच चालली आहे. वित्तीय तूट तसेच चालू खात्यातील अथवा व्यापार तूट या दुहेरी तुटीची सरकारची डोकेदुखी कमी होईनाशी दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला रिझव्र्ह बँकेचा महागाई दराबाबतचा कडवेपणा कायम असून, व्याजदर कपात नजीकच्या काळात तरी शक्य नाही, असेच वारंवार सूचित केले जात आहे. त्यातच जागतिक स्तरावर अमेरिकेत फेरनिवड झालेले ओबामा सरकार ‘फिस्कल क्लिफ’ची स्थिती कशी हाताळते आणि त्याच्या भारतावरील परिणामांबाबत अनेक वेगवेगळे तर्कवितर्क आहेत. एकूण ओबामा यांची फेरनिवड भारताच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यात क्षेत्राच्या दृष्टीने वाईटच म्हटली जात आहे. त्याची प्रचीती उत्तरोत्तर भाव पडत चाललेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअर्समधून दिसून येत आहे. येत्या काळात नेमका कल स्पष्ट होईपर्यंत या उद्योगक्षेत्रापासून अंतर राखून ठेवणेच योग्य ठरेल. कमजोर बनत चाललेल्या रुपयाने या उद्योगक्षेत्राची चिंता आणखीच बळावली आहे.
बहुतांश तांत्रिक विश्लेषकांनी नजीकचा काळात बाजारातील प्रवाह नकारात्मक असल्याचे सुस्पष्ट संकेत दिले आहेत. त्या तालावर अनेक देशांतर्गत गुंतवणूक संस्था (म्युच्युअल फंड, विमा कंपन्या वगैरे) बाजारातून काढता पाय घेत आहेत. विदेशी वित्तसंस्थांची (एफआयआय) मात्र निरंतर खरेदी सुरू आहे.
गेल्या वर्षभरात जरी प्रमुख निर्देशांकांनी माफक वाढ दाखविली असली तरी या स्तंभात सुचविलेल्या अनेक समभागांची  खूपच उमदी कामगिरी राहिली आहे. यातील काही समभाग या पुढेही गुंतवणूक भांडारात राखून ठेवणे फायद्याचे ठरेल. टाटा ग्लोबल बेव्हरेजेस, मारुती सुझूकी, डिव्हिज् लॅब, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, ग्लेनमार्क फार्मा, एचसीएल टेक्नॉलॉजी, झी एंटरटेन्मेंट, महिंद्र अॅण्ड महिंद्र, येस बँक, आयडीएफसी, कोटक महिंद्र बँक, श्रीराम ट्रान्सपोर्ट, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला, बजाज ऑटो, जेपी असोसिएट्स, एनएचपीसी लि., पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, एशियन पेंट्स वगैरेंचा यात समावेश करता येईल.
आगामी आठ वडय़ाचा कल अपेक्षेप्रमाणे मंदीचाच आहे. त्यामुळे नवी खरेदी नकोच. परंतु मिड-कॅपमधील बहर पाहता, रिलॅक्सो फूटवेअर  मध्यमकालीन दृष्टीकोन ठेवून गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.    

Story img Loader