चालू वर्षांचा पहिलीच प्रारंभिक खुली भागविक्री (आयपीओ) लोहा इस्पातच्या रूपाने होळीच्या तोंडावर आली. मुळातच ही विक्री सुट्टय़ांपायी सात दिवस लांबलेल्या कालावधीत प्रस्तावित करण्यात आली, पण या इतक्या दिवसांतही पूर्ण भरणा न झाल्याने भागविक्रीचा कालावधी आणखी लांबवावा लागला. बाजाराचा निर्देशांक २२ हजारांच्या उच्चांकावर असतानाही, भागविक्रीला सामान्य गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळावा, हे आश्चर्यकारकच म्हणावे. गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक बाजारावर रुष्ठ गुंतवणूकदारांचा विश्वास काही केल्या अद्याप कमावता आलेला नाही, हेच यातून दिसून येते. त्या उलट सार्वजनिक उपक्रमांतील कंपन्यांच्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडाला (सीपीएसई-ईटीएफ) मात्र अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. पण या ठिकाणीही सामान्य गुंतवणूकदारांपेक्षा, एलआयसी व अन्य खासगी विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि संस्थात्मक विदेशी गुंतवणूकदारांनीच अधिकाधिक भरणा केलेला दिसतो. खरे तर छोटय़ा गुंतवणूकदारांनी थेट शेअर बाजारात गुंतवणुकीपेक्षा अशा ईटीएफसारख्या पर्यायांकडे संधी म्हणून पाहून त्यांना आपलेसे करायला हवे. किमान पाच हजार रुपयांत १० बडय़ा सार्वजनिक कंपन्यांचा भागहिस्सा त्यांना मिळणार होता. पण एकूण गुंतवणूकदारांमधील विश्वासार्हतेच्या अभावाच्या मुद्दय़ाकडे ‘सेबी’सारख्या नियंत्रक संस्थांनी गांभीर्याने पाहायला हवे.
सलग काही दिवस उच्चांकी स्वारीनंतर, निफ्टी निर्देशांकाने बुधवारी दोन सप्ताहापूर्वीच्या नीचांकावर बुडी घेतली. पुढील काही दिवस तरी बाजाराला चालना देईल अशा वार्ता-घटनांचा अभाव असेल. परंतु निदान वाईट बातमी तरी येऊ नये अशी अपेक्षा करायला हवी. अन्यथा प्रमुख निर्देशांक हे निवडणूक निकालांपर्यंत असेच तोकडय़ा मर्यादेत वर-खाली हालते राहतील, असे चित्र दिसते. आयटी, फार्मा, भांडवली वस्तू, बांधकाम वगैरे क्षेत्रांतील अनेक समभागांमध्ये अतिखरेदीचे चित्र जरूर आहे. अर्थातच हे सर्व तगडे समभाग आहेत. या महिना-दीड महिन्यात मात्र या भावपातळ्या वास्तविक स्तरावर येऊ शकतील. यात ‘अ’ वायदा गटातील लार्ज कॅप समभागांप्रमाणेच, प्रकाशझोतातील मिड-कॅप, स्मॉल-कॅप समभागांचाही समावेश आहे. प्रमुख निर्देशांकांचा कल काहीही असो, या स्थितीतही अनेक मिड-कॅप, स्मॉल-कॅप सप्ताहागणिक भावात ४०-५० टक्क्यांची वाढ केली आहे, असे अनेक नमुने सध्या बाजारात दिसत आहेत. गेल्या सप्ताहापर्यंत सुरू असलेल्या निवडणूक-पूर्व तेजीचा रंग हा काही विशिष्ट समभागांपुरता मर्यादित होता. होळी आणि धुळवडीतून बाजारात सर्वाग न्हाऊन काढणारी रंग-उधळण सुरू होईल, अशी अपेक्षा होती. पण नेमके उलट घडत असून, होळीनंतर बाजाराचा रंगच फिका पडत चालल्याचे दिसत आहे.
तथापि विदेशी वित्तसंस्थांची सतत खरेदी सुरूच आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचा ‘क्यूई डोसा’ची अर्थात आपल्या बाजाराला उसळी देणाऱ्या ‘हॉट मनी’ मात्रा घटत चालली असतानाही डॉलर-पौंडाचा ओघ कमी होताना दिसत नाही. म्हणूनच मधला अफरातफरीचा काळ सोडला तरी वर्षअखेर सेन्सेक्सची सांगता २४ हजारांवर तर निफ्टीकडून सात हजारांचा स्तर गाठला गेल्यास नवल ठरू नये. देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी शुभसूचक असे अनेक संकेत आताच मिळत आहेत.
शिफारस :
तूर्त बाजारात खरेदी नाही. मे महिन्याच्या मध्यापर्यंत बाजारात अस्वस्थता आणि पर्यायाने अनिश्चित स्वरूपाच्या हालचाली सुरू राहतील. आपल्या पसंतीच्या समभागांचे भाव पाच ते १० टक्क्यांनी खाली आले तर ती खरेदीची संधी मानावी. पण कटाक्षाने ‘स्टॉप लॉस’चा दंडक मात्र पाळायला हवा. या आठवडय़ात खरेदीचा मोह टाळावाच!
 

Story img Loader