अडीच वर्षांनंतर ‘सेन्सेक्स’ १९ हजारांपल्याड

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत दोन दिवसात दोन आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भरीव आशावाद निर्माण केल्याने देशातील भांडवली बाजारातही गुरुवारी कमालीचा उत्साह संचारला. परिणामी मंगळवारच्या त्रिशतकी उसळीचा कित्ता मुंबई शेअर बाजारात आज पुन्हा गिरविला गेला. यातून ‘सेन्सेक्स’ने बरोबर अडीच वर्षांनी १९ हजाराचा अनोखा टप्पा पार केला. गुंतवणूकदारांची मत्ता त्यामुळे  केवळ ८० हजार कोटी रुपयांनी वधारली इतकेच नाही तर, बाजाराच्या नवीन उच्चांकाच्या दिशेने प्रवासाबाबत आशावाद उंचावला. ‘निफ्टी’नेही जवळपास शतकी वाढ साधून ५,८२५ या महत्त्वाच्या तांत्रिक अडसरापुढील पल्ला गाठला.
प्रमुख बाजार निर्देशांकांनी त्यांचे बहुप्रतिक्षित टप्पे पार केल्याने ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’चे नजीकच्या दिवसांतील नव्या उच्चांकी स्तराबाबत बाजार विश्लेषकांकडून मांडले कयास केले गेले आहेत. डिसेंबर महिना हा पाश्चिमात्य भांडवली बाजाराप्रमाणे भारतातही ‘सांताबाबाच्या तेजी’चा ठरेल असेा विश्लेषकांचा होरा आहे. सरकारच्या आर्थिक सुधारणांचा क्रम असाच चालू राहिल्यास मार्च २०१२ अखेपर्यंत ‘सेन्सेक्स’ला त्याचा नवा ऐतिहासिक टप्पा अशक्य नाही, असे मत ‘सेंट्रम वेल्थ मॅनेजमेंट’ने नोंदविले आहे. तर ५,८०० च्या पुढे राहणारा ‘निफ्टी’ अवघ्या सप्ताहभरात ६ हजाराला स्पर्श करेल, असे आश्वासक भाकित ‘सीएनआय रिसर्च’ने केले आहे.
सलग दोन दिवसात मुंबई निर्देशांकात ६३४ अंशांची भर पडली आहे. यामुळे ‘सेन्सेक्स’ १९ हजाराच्या पुढे, १९,१७१ वर गेला आहे. २८ एप्रिल २०११ नंतरचा हा निर्देशांकाचा सर्वोच्च टप्पा आहे. प्रमुख निर्देशांकाने २०१० मध्ये २१ हजाराचा ऐतिहासिक स्तर पार केला होत्या. ताज्या तेजीच्या प्रवाहाता हाही उच्चांक लवकरच ओलांडला जाण्याबाबत आशा व्यक्त केल्या जात आहेत.
आर्थिक सुधारणांच्या जोरावर भारताकडून मार्च २०१३ अखेर ६.५ टक्के विकासदर गाठला जाईल, या ‘गोल्डमॅन सॅक्स’ने व्यक्त केलेल्या आशेच्या जोरावर ‘सेन्सेक्स’ने गुरुवारी बाजार सुरू होताच शतकी वाढ नोंदविली. १८,९४७ वर असणाऱ्या निर्देशांकाने मग लगोलग १९ हजाराचा टप्पा पार केला. दिवसभरात शेअर बाजार १९,२०५ या उच्चांकी पातळीवर गेला होता.
‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी २६ समभाग तेजीच्या वारूवर स्वार होते. बजाज ऑटो, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, सिप्ला, स्टरलाईट, रिलायन्स, आयटीसी यांचे मूल्य तेजाळले. १३ पैकी ११ क्षेत्रीय निर्देशांकामध्येही खरेदीचेच वातावरण अनुभवले गेले.     
‘निफ्टी’ ६,००० सर करण्याचे अंदाज
निफ्टी    सीएनआय रिसर्च    आठवडय़ाभरात   ६,०००
    बोनान्झा पोर्टफोलिओ    काही दिवसांमध्येच  ५,८५०
        पुढे लवकरच  ६,०००
सेन्सेक्स    मोतीलाल एएमसी    डिसेंबरअखेर १९,२००+
    सेन्ट्रम वेल्थ मॅनेजमेन्ट    मार्च २०१३ पर्यंत  २१,०००+

Story img Loader