सुधीर जोशी

या  सप्ताहातील खनिज तेलाचे भाव शून्याखाली जाणे ही सर्वात मोठी घटना. अर्थात शून्याखालचे भाव हे वायदा बाजारातील होते. मंगळवारच्या बाजाराच्या घसरणीला हे मोठे निमित्त ठरले. फेसबुकने रिलायन्स जिओचे ९.९९ टक्के समभाग घेतल्याच्या बातमीने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने या सप्ताहात घेतलेल्या १६ टक्यांच्या भरारीने निर्देशांकांना मोठय़ा घसरणीमधून वाचविले. मुंबई सेन्सेक्समध्ये २६० अंकाची तर निफ्टीत ११४ अंकांची घट झाली.

एचडीएफसी बँकेने मार्चअखेर संपलेल्या वर्षांत कोविड-१९ मुळे उद्भविणाऱ्या संभाव्य तोटय़ासाठी तरतूद करूनही नफ्यामध्ये गेल्या वर्षांसाठी १८ टक्के वाढ घोषित केली. शेवटच्या तिमाहीत बँकेच्या ठेवीत विक्रमी वाढ होऊन ‘कासा रेशो’ सुधारला व तंत्रस्नेही व्यवहारांमुळे खर्चात बचत झाली. २०१९ मधील उच्च स्तरावरून ३० टक्के घसरण झालेले बँकेचे समभाग सध्या आकर्षक वाटतात.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या इन्फोसिसचे उत्पन्न १० टक्यांनी वाढून ९०,००० कोटींवर गेले. इतर कंपन्यांप्रमाणे इन्फोसिसला पुढील काही महिने आव्हानात्मक असतील.मात्र २७,००० कोटी रोकड सुलभता बाळगणारी कंपनी खर्चात कपात करून व डिजिटल क्षेत्रात प्रगतीचा जोर कायम ठेवून सध्याच्या परिस्थितीवर सहज मात करेल.

जागतिक करोना आरिष्टय़ात खनिज तेलाच्या मानवनिर्मित संकटाची भर पडली. भारतासाठी खनिज तेलाच्या किंमती कमी होणे जरी फायद्याचे असले तरी जगाच्या अर्थव्यवस्थेमधील उद्योगांचे असणारे परस्परावलंबन पाहता अनेक उद्योग व अर्थव्यवस्था यामुळे डबघाईला येऊ  शकतात. आखाती देशांमधील बांधकाम व पायाभूत सुविधांच्या मागणीमध्ये घट येऊ शकते. तेल विहिरी बांधण्याचा व्यवसाय, तेल वाहतूक व्यवसाय असे उद्योग धोक्यात येऊ  शकतात. आयसीआयसीआय बँकेचे ७६० कोटींचे सिंगापुरस्थित तेल व्यापाऱ्याला दिलेले कर्ज धोक्यात आले आहे. त्यामुळे बँका मोठय़ा उलाढालीच्या शिकार होऊ शकतात.  जग जर मंदीच्या मोठय़ा फेऱ्यात अडकले तर भारतही त्यातून सुटणार नाही व आणीबाणीच्या परिस्थिती येऊ  शकतात.

गेल्या काही दिवसांतील बाजाराच्या निर्देशांकातील तेजी बघता असे वाटू शकते की बाजाराने करोना संकटाला मागे टाकून पुढील वाटचाल सुरू केली आहे. परंतू जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजाकडे पाहता करोनाचे संकट पूर्ण नाहीसे होऊन जगाचे अर्थचक्र  पूर्वपदाला येण्यास १-२ वर्षे तरी जावी लागतील. २० तारखेपासून काही मोजक्या भागातील कारखान्यांना उत्पादन सुरू करण्याची दिलेल्या परवानगीने औद्योगिक उत्पादनांवर फारसा परिणाम घडून येणार नाही. कारण कारखान्यांना कच्चा माल, पॅकेजिंग, वाहतूक सेवा पुरविणाऱ्या अनेक छोटय़ा मोठय़ा उद्योगांची साखळी सुरू झाली पाहिजे. सध्याच्या तेजीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा वाटा आहे. त्यामुळे अशावेळी थोडी नफाकमाई करण्यास हरकत नसावी.

पुढील आठवडय़ात हिंदुस्तान यूनिलिव्हरसह इतर कंपन्यांचे वार्षिक निकाल व उद्योग सावरण्यासाठीचे सरकारी धोरण बाजाराला नवी दिशा देतील.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader