सुधीर जोशी

कंपन्यांचे निकाल सोडले तर बाजाराला दिशा देणारा कुठलाच प्रभावी दिशादर्शक सध्या भारतामध्ये नसल्यामुळे बाजारावर जागतिक घटनांचा परिणाम अधिक होत आहे. अमेरिकेच्या अर्थप्रोत्साहनाला होणाऱ्या विलंबामुळे अमेरिकन बाजार खाली आले. रिलायन्सच्या ‘फ्युचर रिटेल’ व्यवसाय अधिग्रहणास दिलेल्या स्थगितीमुळे निर्देशांकात प्रभाव असणारा रिलायन्सचा समभाग खाली आला व सप्ताहाची सुरुवातच मोठय़ा घसरणीने झाली. पुढील सर्व दिवसांत जागतिक बाजारांवर आधारित मोठे हेलकावे बाजार घेत होता. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स, निफ्टीत अडीच टक्क्यांची घट होऊन मागच्या सप्ताहात झालेली सारी वाढ निष्फळ ठरली.

कोटक महिंद्र बँकेचे तिमाही निकालांचे बाजाराने स्वागत केले. आधीपासून उच्च गुणवत्ता असणारी बँकेच्या समभागात आगामी काळासाठी अन्य बँकांच्या अधिग्रहणाच्या शक्यतेमुळे मोठी तेजी निर्माण झाली. भावी काळासाठी पुरेशी भांडवलपूर्ती, करोनाकाळाशी निगडित बुडीत कर्जासाठी पुरेशी तरतूद व इतर उपकंपन्यांमधील संभाव्य निर्गुतवणुकीच्या फायद्याची शक्यता यामुळे बाजारातील घसरणीच्या काळात यामध्ये गुंतवणुकीचा विचार करावा.

परसिस्टंट सिस्टीम्स या मिडसाइझ आयटी कंपनीचे आठवडय़ाच्या सुरुवातीला लागलेले निकाल उत्साहजनक आहेत. कंपनीची सर्वाधिक विक्री सेवाक्षेत्रात असून या विभागाच्या विक्रीत वार्षिक ७ टक्के तर मागील तिमाहीच्या तुलनेत ३.८ टक्के वाढ झाली आहे. व्यवस्थापनाने आगामी काळात व्यवसायवृद्धी समाधानकारक राहण्याचे संकेत दिले असून नफ्याचे प्रमाण वाढण्याची आशा व्यक्त केली आहे. कंपनीला एक मोठे कंत्राट मिळण्याच्या वाटाघाटी प्रगतिपथावर असल्याचे कळते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीचा समावेश किमान वर्षभरासाठी केल्यास चांगला नफा होऊ शकेल.

पायाभूत सुविधा निर्मितीमधील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे निकाल मागील तिमाहीपेक्षा उजवे आहेत. उपव्यवसाय विक्रीतून आलेल्या उत्पन्नातून १२ रुपये प्रति समभाग अंतरिम लाभांश जाहीर झाला आहे. कंपनीकडे नोंदविलेल्या मागण्यांची कमी नाही. करोनासंलग्न अडचणी दूर होतील तशी कंपनी प्रगती करेल. मात्र ही कंपनी कमी अवधीत मोठा नफा मिळवून देणारी नाही.

भारती एअरटेलच्या दुसऱ्या तिमाहीतील सेवा उत्पन्नात २६ टक्के वाढ होऊन नफाक्षमता वाढली आहे. दूरसंचारक्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीच्या समभागाची सध्याची पातळी या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी आश्वासक वाटते. बाजार सध्या करोनापूर्व काळाच्या पातळीवर स्थिर होत आहे. त्यामुळे सध्या निर्देशांकात होणारे चढ-उतार केवळ तात्पुरते आहेत व अल्प मुदतीच्या सौदे करणाऱ्यांना त्यात मोठय़ा संधी मिळत आहेत. चांगले निकाल जाहीर झालेल्या कंपन्यांचे समभागही नफावसुलीमुळे थोडे खाली जात आहेत. पण दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांना अशा कंपन्यांत आपला सहभाग वाढवण्याची ही संधी आहे. करोनाच्या वाढीस आळा बसल्याची लक्षणे दिसत आहेत. वाहन कंपन्यांच्या सणासुदीच्या विक्रीचे आकडे समाधानकारक आहेत. पुढील सप्ताहात अमेरिकन निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर बाजारातील अनिश्चिततेचे एक प्रमुख कारण दूर होईल व बाजाराची दिशा निश्चित होईल. आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, एचडीएफसी, सन फार्मा सोबत रिलायन्सच्या तिमाही निकालांवर बाजार प्रतिक्रिया देईल.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader