सुधीर जोशी

गेले पाच सप्ताह सुरू असलेली तेजीची वाटचाल या सप्ताहातही कायम राहिली. कर्णधार रिलायन्सच्या जोडीला माहिती तंत्रज्ञान व बँकिंग क्षेत्रातील फलंदाजांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे १,१०८ व २९३ अंकांची वाढ होऊ न बाजाराने साप्ताहिक वाढीचा उत्तुंग षटकार मारला.

या सप्ताहात जाहीर झालेल्या तिमाही निकालांमध्ये एसबीआय कार्डच्या नफ्यात १४ टक्के वाढ झाली. यामध्ये व्याजरूपी मिळकतीचा वाटा मोठा होता. अनेकांचा रोजगार बंद झाल्याने कर्जहप्ता स्थगितीमुळे अशा कंपन्यांच्या व्याजाच्या मिळकतीत वाढ होईल. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नवीन कार्डधारकांची संख्या एक लाखाने वाढली. कार्ड वापरामध्ये घट झाली असली तरी टाळेबंदीत शिथिलता येईल त्याप्रमाणे व्यवहारांचे प्रमाण वाढेल. एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफच्या नफ्यात पाच टक्के वाढ झाली तर आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफचा नफा त्याच पातळीवर राहिला.

आयसीआयसीआय लोंबार्ड या सर्वसाधारण विमा कंपनीच्या नफ्यात २८ टक्के वाढ झाली. टाळेबंदीमुळे नवीन विम्याचे प्रमाण घटले तरी वाहन अपघात भरपाईच्या दाव्यात झालेल्या घटीमुळे नफ्याचे प्रमाण वाढले. येणाऱ्या काळात अपघात विम्याच्या दाव्यांमध्ये वाढ झाली तरी नवीन वाहन विक्री वाढेल तसे विम्याचे प्रमाणही वाढेल. त्यामध्ये भर पडेल ती आरोग्य विम्याची. त्यामुळे दीर्घमुदतीमध्ये या कंपनीतील गुंतवणूक फायद्याची असेल.

पॉलिकॅब इंडिया ही कंपनी विद्युत उपकरणे व विद्युत प्रवाहासाठी वापरण्यात येणाऱ्या वायर व केबल्सचे उत्पादन करते. कंपनीच्या पहिल्या तिमाही निकालांवर टाळेबंदीचा परिणाम झाला. तरीही जून महिन्यात घरगुती वापराच्या विद्युत तारांच्या मागणीत वाढ दिसून आली. पंख्यांच्या खरेदीसाठी एप्रिल, मे हा उन्हाळ्याचा मोसम वाया जाऊ नही प्राप्तिकर परतावा व विदेशी चलनाच्या व्यवहारात फायदा झाल्यामुळे कंपनीला नफाक्षमता टिकवून ठेवता आली. वायर व केबलच्या व्यवसायात अग्रभागी असलेली व विद्युत उपकरणांत पाय रोवत असलेल्या या कंपनीतील गुंतवणूक दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्य नफा देऊ  शकते.

हिंदुस्तान यूनिलिव्हरने जीएसके कंझ्युमरचे अधिग्रहण, खर्चावरील नियंत्रण व व्यवसायातील वैविध्यामुळे नफ्याची पातळी राखून आपले वर्चस्व सिद्ध केले. निकाल जाहीर झाल्यावर खाली आलेले बाजारमूल्य खरेदीसाठी आकर्षक आहे. सध्याच्या खरेदीवर ९.५० रुपये अंतरिम लाभांशही मिळेल.

आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांवरून कोविड महामारीमुळे कंपन्यांच्या कामगिरीवर झालेला परिणाम पाहता माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने बाजी मारलेली दिसते. विमा कंपन्या, ग्राहक उपभोग्य क्षेत्रातील कंपन्या व्यवसायातील विविधतेमुळे परिस्थितीवर मात करीत आहेत. टाळेबंदीमुळे लघू आणि मध्यम व्यवसायांवर आलेल्या संकटाने बुडीत कर्जाचे वाढणारे प्रमाण बँकांच्या नफ्यावर दबाव टाकत आहे. बाजारात रंगलेल्या सामन्यात शेवटच्या क्षणी सहभागी होणाऱ्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की, निफ्टीचा पीई रेशो २९ या धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे यापुढील गुंतवणूक सावधानतेने करायला हवी.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader