सुधीर जोशी
सप्ताहाच्या आरंभी दमदार सुरुवात करून बाजाराने अखेरच्या दिवसात माघार घेतल्याने प्रमुख निर्देशांकात माफक घसरण झाली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे १६४ व ३३ अंकांची घट झाली. या सप्ताहात औषध, पोलाद व धातू क्षेत्रातील कंपन्या आघाडीवर होत्या. पाठोपाठ बांधकाम व वाहन क्षेत्रातील कंपन्यांचा सहभाग, बाजाराचा मूलभूत क्षेत्रातील वाढीवरचा विश्वास दर्शवतो.
देशांतर्गत संरक्षण सामग्री निर्मितीबाबत सरकारने घेतलेल्या घोषणांचा परिणाम संरक्षण साहित्य निर्माण करणाऱ्या हिंदुस्तान एरोनोटिक्स, भारत फोर्ज, भारत इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या कंपन्यांवर दिसून आला.
या तिन्ही कंपन्यांसाठी पुढील काही वर्षे उत्साहाची राहतील. त्यांना मिळणाऱ्या कंत्राटांकडे लक्ष ठेवून, सध्या अचानक वाढलेल्या बाजारभावात थोडी घसरण होईल तेव्हा या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी घेता येईल.
गेल्या तीन महिन्यांत ५० टक्के वाढलेल्या महिंद्र आणि महिंद्रच्या पहिल्या तिमाहीतील वाहनविक्रीत ७८ टक्के व नफ्यात ९७ टक्के घट झाली असली तरी विक्रीतील ग्रामीण विभागाचा वाटा १२ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीचा देशातील ट्रॅक्टरविक्रीत जवळपास ४० टक्के वाटा आहे.
एसयूव्हीमध्येही आघाडीवर असणाऱ्या कंपनीला शेतीमध्ये अपेक्षित असणाऱ्या सुबत्तेचा व सरकारच्या अनुकूल धोरणांचा फायदा होईल.
ऑनलाइन व्यवहारांचे वाढते प्रमाण, स्मार्टफोनमुळे डेटाचा वाढता वापर यामुळे दूरसंचार कंपन्यांचे प्रति ग्राहक उत्पन्न वाढतच आहे. रिलायन्स जिओ व भारती एअरटेल या दोनच कंपन्या शर्यतीत टिकून राहण्याचीच चिन्हे अधिक आहेत. त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी दूरसंचार क्षेत्रामधील गुंतवणुकीसाठी भारती एअरटेलचा विचार करता येईल.
औषध क्षेत्रातील कंपन्यांची सध्या जोरदार आगेकूच सुरू आहे. आजवरचे तिमाही निकाल पाहता गुंतवणुकीसाठी डिव्हिज लॅब व सिप्लाचा विचार करता येईल. पहिल्या तिमाहीत डिव्हिज लॅबच्या नफ्यात ८२ टक्के वाढ झाली.
कंपनीचे कर्जाचे प्रमाण कमी आहे व आजवर मुख्यत्वे चीनकडून आयात होणाऱ्या एपीआयच्या भारतातील निर्मितीमध्ये कंपनीचा मोठा वाटा आहे. सिप्लाच्या तिमाही नफ्यात २१ टक्के वाढ झाली आहे. श्वसनरोगांवरील औषधांसाठी सिप्ला भारतात प्रथम क्रमांकावर आहे. कंपनी प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात करते.
टाटा स्टीलच्या निकालांवर करोनाचा परिणाम दिसला. कंपनीला पहिल्या तिमाहीत ४,६४८ कोटी रुपयांचा तोटा झाला. तरीही कंपनीचा कारभार पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. भूषण स्टीलच्या अधिग्रहणानंतर नफा देणाऱ्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे मंदीतून जाणाऱ्या या समभागाकडून अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
किरकोळ किमतींवर आधारित महागाई निर्देशांकात जून व जुलैमध्ये वाढ झाली आहे. ही थोडी काळजीची बाब आहे.
बाजारातील तेजी वेगाने झाल्यामुळे या सप्ताहातील घसरण आणखी काही दिवस सुरू राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांनीदेखील खरेदीमध्ये सावधगिरी दाखवण्याची गरज आहे.
* sudhirjoshi23@gmail.com