सुधीर जोशी

गेल्या सप्ताहातील घसरण या सप्ताहात काही अंशी भरून निघाली. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीमधे अनुक्रमे ४९७ व १२१ अंशांची वाढ झाली. जागतिक आर्थिक सुधारणेच्या अनिश्चितीमुळे अमेरिकी बाजारातील मोठी घसरण, भारत चीन सीमेवरील तणाव अशा या सप्ताहातील घटनांचा भारतीय बाजारावरील परिणाम फारच अल्प काळ टिकला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या किरकोळ विक्री व्यवसायात परदेशी गुंतवणूकदारांच्या विश्वासामुळे कंपनीच्या समभागांनी सार्वकालिक उच्चांक गाठताना सप्ताहअखेर भरघोस वाढ नोंदवली. सरलेल्या सप्ताहात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीसही उदंड प्रतिसाद मिळाला. सर्व नकारात्मक बातम्यांना मागे सारत पुढे जाण्याची बाजाराची चिवट झुंज सुरूच राहिली आहे.

करोनाची लस सामान्य भारतीय लोकांपर्यंत पोहोचण्यास अजून वर्षभर तरी जावे लागेल. त्यामुळे सध्याच्या बदललेल्या समाजव्यवस्था विचारात घेऊन आपल्या गुंतवणुकीचा विचार करावा लागेल. स्वत:चे वाहन असण्याच्या गरजेमुळे मारुती सुझुकी, हीरो मोटर्ससारख्या कंपन्या वाहन विक्रीत मुसंडी मारत आहेत. या कंपन्यांमध्ये नवीन गुंतवणुकीला वाव आहे. नैसर्गिक आयुर्वेदिक उपायांवरच्या वाढलेल्या विश्वासामुळे डाबरसारखी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. च्यवनप्राश, मध व त्यावर आधारित पारंपरिक उत्पादनांबरोबर तरुण पिढीला भावणारी सौंदर्यप्रसाधने, औषधे, पाचके, फळांचे रस, घरगुती कीटकनाशके, सॅनिटायझर्स अशा अनेक उत्पादनांची मालिका कंपनीकडे आहे. गेली दहा वर्षे कंपनीच्या फायद्यात सातत्याने वाढच झाली आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स ही कंपनीदेखील घरगुती कीटकनाशके व सौंदर्यप्रसाधनांचा जोमाने विस्तार करून हॅण्डवॉशसारख्या नवीन उत्पादनांची मालिका बाजारात आणत आहे. या दोन्ही कंपन्यांना परदेशातून मिळणारे उत्पन्न अनुक्रमे २५ व ४६ टक्के आहे जे जोखीम विभाजनाच्या दृष्टीने विचारात घ्यायला हवे.

घरून काम करण्याची रुळू पाहात असलेली पद्धत; उपाहारगृहांपेक्षा घरगुती खाण्याकडे लोकांचा कल आणि नवीन पदार्थ बनविण्याचा तरुणांना छंद लागला आहे. याचा फायदा हॉकिन्स या स्वयंपाकघरातील उपकरणांच्या बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीला मिळेल. पंतप्रधान उज्ज्वला योजनेमुळे गॅसच्या चुली वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण अशा दोन्ही बाजारपेठेत कंपनीच्या उत्पादनांना मागणी राहील.

करोनाकाळात कर्जफेडीला स्थगिती दिल्यावर त्या रकमेवर व्याज आकारावे की नाही याचा निर्णय अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे बँकाच्या समभागांवर दबाव आहे. भारत-चीन सीमेवरचा तणावही अधूनमधून बाजारावर विक्री दबाव आणत असतो. परंतु तो अल्पकाळच टिकतो म्हणून अशा दिवशी खरेदीचा मुहूर्त अवश्य साधावा.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader