सुधीर जोशी

एका सप्ताहाच्या विश्रांतीनंतर बाजाराची आगेकूच परत सुरू झाली. या सप्ताहात आघाडी घेतली ती मुख्यत्वे पोलाद व अन्य धातू क्षेत्रातील कंपन्यांनी. वाहन व इतर क्षेत्रातील मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्याही त्यात सहभागी झाल्या. रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमासिक पत धोरणाचाही बाजारावर सकारात्मक परिणाम होऊन साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अनुक्रमे ४३३ व १४१ अंकांची वाढ झाली व मागील सप्ताहातील घसरणीची भरपाई झाली.

टाटा केमिकल्सच्या अन्न विषयक व्यवसायांचे अधिग्रहण करून टाटा कंझ्युमर ही कंपनी मोठय़ा प्रगतीपथावर जात आहे. चहा, कॉफी, पेयजल, मीठ, डाळी, मसाले, घरी बनविण्यासाठी तयार अन्न पाकिटे व जोडीला स्टार बक्सची दालने अशा सर्व प्रकारात ग्राहक उपभोग्य वस्तूंची बाजारपेठ काबीज करण्यासाठी ही कंपनी सज्ज होत आहे.

पहिल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत १३ टक्के तर नफ्यात ८१ टक्के वाढ झाली. कोविड-१९ साठीचा टाळेबंदीचा काळ ब्रिटानिया, डाबरसारख्या कंपन्यांसोबत याही कंपनीला फायदेशीर ठरला आहे. परंतु या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा भाव खाली येण्याची वाट पाहावी लागेल.

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या पहिल्या तिमाहीत विक्रीचे आकडे कायम राखत नफ्यामध्ये ३ टक्के वाढ झाली आहे.

कंपनीच्या उत्पादनात घरगुती कीटकनाशके व आरोग्याशी निगडित उत्पादनांचा वाटा ८५ टक्के आहे. सध्याच्या काळात त्याचा फायदा कंपनीला मिळाला आहे. कंपनीने या श्रेणीमध्ये नवीन ४५ उत्पादनांची भर घातली आहे. पुढील एक वर्षांच्या काळासाठी कंपनीतील गुंतवणूक फायद्याची ठरेल.

चंबळ फर्टिलायझर्सला पहिल्या तिमाहीत विक्रीत १२ टक्के तर नफ्यात ८० टक्के वाढ झाली आहे. कंपनीचे सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शेती क्षेत्राच्या प्रगतीशी निगडित असणाऱ्या या कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे.

बाजारातील तेजीच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये बदल करण्यास हरकत नाही.

सध्या उच्चतम भाव पातळी गाठलेल्या कंपन्यांमधून थोडी नफा वसुली करून किंवा या तेजीमध्ये सहभागी न झालेल्या कंपन्यांचे समभाग विकून नवीन कंपन्यांमध्ये शिरकाव करण्याची तसेच चांगल्या कंपन्यांमधील गुंतवणूक वाढवण्याची संधी आहे.

कंपन्यांच्या उत्पादनांची अपरिहार्यता, मूलभूत गरजा, उपयुक्तता, सध्याच्या काळाची गरज अशी वर्गवारी केली तर गुंतवणुकीची क्षेत्रे शोधणे कठीण नाही.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader