सुधीर जोशी

जागतिक बाजारांच्या लाटेवर स्वार होऊन सप्ताहाची सुरुवात सुसाट झाली. खासगी तसेच सरकारी बँकांच्या समभागात मोठी खरेदी झाली. कंपन्यांच्या जाहीर झालेल्या तिमाही निकालांवर बाजारामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे बाजाराच्या निर्देशांकांमध्ये मोठी आंदोलने सुरू होती. परंतु बाजारात एकूणच तेजीचा नूर कायम होता. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्स व निफ्टीत अनुक्रमे ७०४ व १६८ अंशांची वाढ होऊन मागच्या सप्ताहात झालेली घट भरून निघाली.

टाळेबंदी अंशत: उठत असताना उद्योगांच्या उलाढालीत त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. डी-मार्टची उलाढाल गेल्या वर्षांच्या तुलनेत ९० टक्के झाली आहे, पण नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. कारण टाळेबंदी काळात किराणासारख्या जीवनावश्यक वस्तूंचीच विक्री जास्त झाली आहे. तसेच इंटरनेटवरून विक्रीसाठी कंपनीची व्यवस्था अजून भक्कम नाही. भविष्यात रिलायन्स रिटेलबरोबर सामना करण्यासाठी कंपनी काय पावले उचलते याचा अंदाज आल्याशिवाय कंपनीमध्ये नवीन गुंतवणूक टाळावी.

ब्रिटानियाने मागील वर्षांच्या तिमाहीच्या तुलनेत विक्रीचे प्रमाण वाढले, पण नफा थोडा घटला आहे. बाजाराने त्यावर थोडी विषम प्रतिक्रिया दिली. उत्तम विपणन व्यवस्था व टाळेबंदीमध्ये उपाहारगृहे बंद असताना पॅकबंद खाद्यपदार्थाच्या मागणीत झालेली वाढ कंपनीच्या पथ्यावर पडली. येणारी दिवाळी व कच्च्या मालाच्या किमती कमी राहण्याची शक्यता आणि वाढवलेली उत्पादन क्षमता यामुळे सध्या झालेल्या समभागातील मोठय़ा घसरणीचा फायदा घेऊन वर्षभरासाठी गुंतवणूक करता येईल.

एसीसीच्या सिमेंटची विक्री मागील वर्षांतील पातळीवर आली. नफ्यातही २० टक्के वाढ झाली. अल्ट्राटेक सिमेंटच्या विक्रीत २० टक्के वाढ झाली. खर्चावर नियंत्रणासह कंपनीने नफा ३० टक्क्य़ांनी वाढवला. पावसाळ्याच्या मोसमात सिमेंटची मागणी कमी असते तरीही तिमाहीतील ही चमकदार कामगिरी पुढील प्रगतीचे आडाखे बांधण्यास पुरेशी आहे. बजाज फायनान्सच्या नफ्यात ३६ टक्क्य़ांची घट झाली तर एसबीआय कार्डच्या नफ्यात ४६ टक्के घट झाली. किरकोळ कर्जामधील बुडीत खात्यांचे वाढते प्रमाण यामध्ये बघायला मिळते. त्यामुळे नजीकच्या काळात या समभागात मोठी वाढ दिसणे अशक्य वाटते.

माहिती तंत्रज्ञानाच्या सलामीवीरांनी केलेल्या दमदार सुरुवातीनंतर या सप्ताहात जाहीर झालेल्या कंपन्यांच्या निकालांनी बाजारातील वातावरण उत्साही ठेवले. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे स्पष्ट संकेत यात मिळत आहेत. पुढील सप्ताहात बाजाराचे लक्ष कोटक महिंद्र बँक, लार्सन अ‍ॅँड टुब्रो, टायटन यांच्या तिमाही निकालांकडे असेल. गेल्या काही दिवसांत वाढलेल्या समभागांमध्ये नफावसुली करून सिमेंट, स्टीलसारख्या मूलभूत उद्योगांमध्ये दीर्घ मुदतीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीस हरकत नाही. अमेरिकी निवडणुकांच्या निकालांची भाकिते मोठे चढ-उतार घडवतील.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader