सुधीर जोशी

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे सावट भांडवली बाजारावर चालू आठवडाभर होते. शुक्रवारी बाजार बंद झाल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या लागलेल्या तिमाही निकालांचा परिणाम आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी दिसून आला. कामकाजाच्या सुरुवातीला ८ टक्कय़ांहून अधिक घसरण झालेला रिलायन्स बंद होताना काहीसा सावरला असला तरी  रिलायन्सचा समभाग सोमवारी ५ टक्यांपेक्षा अधिक घसरणीने बंद झाला. दूरचित्रवाणीवर आयपीएल मैदानात अंबानी कुटुंबीयांच्या झालेल्या दर्शनाने मुकेश अंबानी यांच्या प्रकृतीबाबतच्या बातम्यांना विराम दिला.

आठवडाभर अमेरिकेतील राजकीय अस्थिरतेचे सावट बाजारावर दिसून आले. आठवडाभरात वर-खाली जाणारे निर्देशांक डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांच्या निवडीची चाहूल लागल्याने सप्ताहाअंती सेन्सेक्स व निफ्टी अंशवाढ नोंदवत बंद झाले.

गेल्या आठवडय़ात लागलेल्या कं पन्यांच्या तिमाही निकालांपैकी काहींचे निकाल लक्षवेधी आहेत. त्यापैकी कान्साई नेरोलॅक पेंट्सच्या निकालात सजावटीच्या रंगाच्या व्यवसायातील वाढीची दोन आकडय़ातील नोंद मागील तिमाहीच्या तुलनेत आशादायक आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे हे चिन्ह आहे. औद्योगिक वापराच्या रंग उत्पादनांमध्ये घट दिसून आली आहे. कंपनीने खर्चावर नियंत्रण राखल्याने आणि कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्याचा लाभ निकालातून दिसून आला. मागील अनेक वर्षे दोन आकडय़ातील वृद्धीदर राखणारी ही कंपनी कायम गुंतवणूक म्हणून ठेवण्यासाठी मुहूर्ताच्या सौद्यात खरेदी करावी अशी आहे.

एआयए  इंजिनीअरिंग ही अभियांत्रिकी वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी तिच्या उत्पादनांचा मोठा वाटा निर्यात करते. रुपया अवमूल्यनाचा फायदा कंपनीला झाला आहे. आर्थिक स्रोताचा योग्य उपयोग, अवांतर खर्चावर सध्याच्या कठीण कालावधीत कठोर नियंत्रण राखल्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर दिसून आला आहे. ही कंपनी सध्याच्या दरात खरेदीयोग्य असून तीन ते चार वर्षांत भाव दुप्पट होण्याची शक्यता वाटते.

बाजार नेहमीच शक्यतांवर वाटचाल करत असतो. जो बायडेन यांचा विजय दृष्टिपथात आल्याने या विजयाचे लाभार्थी अक्षय ऊर्जा, आरोग्य  आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांना फायदा होईल. याचा परिणाम भारतातील संबंधित उद्योग क्षेत्रात दिसेल. परंतु ट्रम्प यांच्या चमूने न्यायालयात दाद मगितली तर या घडामोडीचा मात्र पुढील आठवडय़ातील बाजारावर नकारात्मक परिणाम होईल.

पुन्हा निवडणुका जाहीर झाल्यास अमेरिकी बाजारातील रोकड सुलभतेला ओहोटी लागेल. याचा विपरीत परिणाम डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात दिसून येईल. तूर्त नवीन खरेदीला विराम देणेच हिताचे राहील.

sudhirjoshi23@gmail.com

Story img Loader