मतदानोत्तर जनमत चाचण्यांची प्रतिक्षा न करता सलग दुसऱ्या व्यवहारात निर्देशांकाचा विक्रम नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने मंगळवारी २४ हजाराचे सर्वोच्च शिखर पादाक्रांत केले. येत्या शुक्रवारी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी पंतप्रधान असणारे लोकशाही आघाडी सरकार येणार या गुंतवणूकदारांच्या अंदाजाला सोमवारी उशिरा जाहिर झालेल्या मतदानोत्तर चाचणीने शिक्कामोर्तब केले. त्याच जोरावर सलग तिसऱ्या व्यवहारात विक्रमी नोंद करत राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ७,१०० च्या पुढे गेला.
शुक्रवार, सोमवार आणि मंगळवारी अशा सलग तीन व्यवहारात सेन्सेक्ससह निफ्टीने विक्रमी पाऊल टाकले. आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात दुपारीच सेन्सेक्सने २४ हजारापर्यंत चढाई केली. तर निफ्टी ७,२०० नजीक जाऊन भिडला. दिवसअखेर मुंबई निर्देशांकांमध्ये ३२०.२३ अंश भर पडत तो २३,८७१.२३ वर तर निफ्टी ९४.५० अंशांच्या तेजीसह ७,१०८.७५ पर्यंत स्थिरावला. दोन्ही प्रमुख निर्देशांकातील वाढ ही १.३५ टक्के राहिली.
५४३ सदस्य असलेल्या लोकसभेत भाजपाप्रणित लोकशाही आघाडी सरकारचे संख्याबळ २४९ ते २९० दरम्यान फिरते असेल, (बहुमतासाठी आवश्यक २७२) या अंदाजामुळे केंद्रात यंदा स्थिर सरकारचे चित्र उमटण्याच्या आशेवर शेअर बाजारात मंगळवारी ऊर्जा, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, बांधकाम क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली. सेन्सेक्समधील केवळ सहा कंपनी समभागांचे मूल्य रोडावले. नफेखोरीच्या धोरणामुळे मिड व स्मॉल कॅपमधील कंपन्यांनाही अनुक्रमे २.७६ व २.६५ टक्के अधिक भाव मिळाला.
सोमवारी सायंकाळी उशिरा जाहिर झालेल्या मार्चमधील घसरत्या औद्योगिक उत्पादन दर व एप्रिलमधील सलग तिसऱ्या महिन्यात उंचावणाऱ्या किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीचा काडीमात्र परिणाम मंगळवारीही झालेला दिसून आला नाही. शुक्रवार व सोमवार मिळून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी ही आता २,५०० कोटी रुपयांवर गेली आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या दफ्तरी २२५ कंपनी समभागांचे मूल्य हे गेल्या ५२ आठवडय़ांच्या वरच्या टप्प्यावर बंद झाले. यामध्ये एसीसी, भेल, बीपीसीएल, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, एचपीसीएल, टाटा मोटर्स यांचा क्रम लागला. तर १२ पैकी ११ क्षेत्रीय निर्देशांक तेजीत राहिले.

सेबी, रिझव्‍‌र्ह बँकेचा विशेष नियंत्रण कक्ष
१६ व्या लोकसभेसाठी सोमवारअखेर झालेल्या नऊ टप्प्यातील मतदानानंतर शुक्रवारी जाहिर होणाऱ्या मतमोजणीच्या पाश्र्वभूमिवर भांडवली बाजारात मोठय़ा फरकेचे चढ-उतार लक्षात घेऊन बाजार नियामक सेबी व रिझव्‍‌र्ह बँक यांनी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यानुसार उभय नियामकांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक चमू स्थापन करण्यात आला असून तो विविध  निर्देशांकाच्या हालचाली टिपणार आहे. या कक्षाचे कार्य सोमवारपासूनच सुरू झाले असून ते मतमोजणीनंतर येत्या सोमवापर्यंतही कायम राहणार असल्याचे समजते.
अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी बाजारात मोठय़ा फरकाची हालचाल नोंदली गेल्यास येणाऱ्या अडचणी, आव्हानांचा सामना करण्यासाठी भांडवली बाजारांनी तयार रहावे, अशी यंत्रणाही असावी, असा आग्रह नियामकांनी बाजारांना केला आहे. यानुसार, एखादा कंपनी समभाग मूल्य ७ टक्क्य़ांपेक्षा अधिकने रोडावले अथवा १५ टक्क्य़ांपेक्षा अधिकने उंचावले तर शेअर बाजारांना ‘डमी फिल्टर’ लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सलग तीन दिवस उच्चांकी स्थापन करणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी प्रत्येक दिवशी जवळपास दोन टक्क्य़ांची वाढ नोंदविली आहे.
सर्किट ब्रेकरची छाया
१८ मे २००९ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्याचे मतमोजणी जाहिर झाल्यानंतर भांडवली बाजाराने अवघ्या ३० सेकंदात अप्पर सर्किट मोडले होते. यानंतर बाजारातील व्यवहार तब्बल दोन तास बंद ठेवावे लागले होते.
रुपया नऊ महिन्यांच्या उच्चांकावर
सोमवारच्या सत्रात १० महिन्याच्या भक्कम स्थळापासून व्यवहारअखेर डळमळणारा रुपया मंगळवारी पुन्हा गेल्या नऊ महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन आठवडय़ातील दुसऱ्या दिवशी ३७ पैशांनी उंचावत ५९.६८ वर गेले. सोमवारी ५९.५१ असा गेल्या १० महिन्यातील उच्चांक राखल्यानंतर चलन दिवसअखेर ६०.०५ अशा शुक्रवारच्या अवघ्या एक पैशांनी घसरले होते. चलनाची मंगळवारची झेप ही २५ एप्रिलनंतरची सर्वोत्तम राहिली आहे. यावेळी रुपया ४७ पैशांनी उंचावला.
सोने २९,५०० च्या आसपास
भांडवली आणि परकी चलन बाजारात तेजी नोंदली जात असताना सराफा बाजारात मात्र दरांची उतराई मंगळवारी अनुभवली गेली. यामुळे सोन्याचे दर आता तोळ्यासाठी २९,५०० रुपयांच्या आसपास येऊन पोहोचले आहेत. शहरात स्टॅण्डर्ड धातूचा १० ग्रॅमचा भाव एकाच व्यवहारात २२० रुपयांनी कमी होत २९,४८५ रुपयांपर्यंत खाली आला. चांदीचा किलोचा भावही मंगळवारी २१५ रुपयांनी कमी होऊन ४२,४४० रुपयांवर येऊन ठेपला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुक्रवारी शेअर बाजार उंचावला अथवा आपटला तर..
प्रमाण    दरम्यान व व्यवहार        
१० %     दुपारी १ वाजेपूर्वी ४५ मिनिटे बंद  आणि दुपारी १ ते २.३० दरम्यान १५   मिनिटे बंद    
१५ %    दुपारी १ वाजेपूर्वी १.४५ मिनिटे बंद     आणि दुपारी १ ते २ दरम्यान ४५ मिनिटे बंद
२० %    उंचावला वा आपटला तर त्या संपूर्ण दिवसासाठी व्यवहार ठप्प.

Web Title: Markets break records sensex nifty ends at an all time high
Show comments