राष्ट्रपतींचे संसदेच्या संयुक्त अधिवेशनातील अभिभाषण म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचा आर्थिक सुधारणांवर भर देणारा कार्यक्रमाचेच प्रतिबिंब असल्यो त्यावर सोमवारी शेअर बाजाराने प्रचंड विश्वास व्यक्त करीत निर्देशांकांना नव्या विक्रम शिखरावर नेऊन बसविले. १८३.७५ अंश वाढीसह सेन्सेक्स २५,५८०.२१ वर, तर राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ७१.२० अंश वाढीसह ७६५४.६० पर्यंत झेपावला. सलग तीन व्यवहारांतील सेन्सेक्सची वाढ ७७४.३८ अंशांची आहे.
शुक्रवारच्या विक्रमानंतर नव्या सप्ताहाची सुरुवात २५,५००च्या पुढे करताना सेन्सेक्स प्रारंभीच्या अध्र्या तासात २५,४९६.८४ पर्यंत खाली आला. पण पुढे मात्र त्याने २५,५०० पुढील कामगिरी कायम ठेवली. असे करताना दुपारपूर्वी तो २५,६४४.७७ या दिवसातील सर्वोच्च टप्प्यावरही पोहोचला. सप्ताहारंभीच्या व्यवहारात ७६७३.७० पर्यंत झेपावलेल्या निफ्टीनेही दिवसअखेर नव्या विक्रमाची नोंद केली. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्याच्या आतील वाढ राखली गेली.

संसदेत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नव्या लोकशाही आघाडी सरकारचा भर आगामी कालावधीत वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी, थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारणे, अनेक बडय़ा प्रकल्पांसमोरील मंजुरी अडथळे दूर सारणे, तसेच विपरीत परिणाम करणार नाही असे कर लागू करणे यावर असेल, असे स्पष्ट केले. यामुळे हुरळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराला सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविणे भाग पाडत ऐतिहासिक उचींवर नेऊन ठेवले.
सलग दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक उच्चांक राखणाऱ्या भांडवली बाजारात सोमवारी गुंतवणूकदारांची मालमत्ता एक लाख कोटी रुपयांनी वाढली. दिवसअखेर ती शुक्रवारच्या तुलनेत ९०.२६ लाख कोटी रुपये झाली. मुंबई शेअर बाजारातील १२ पैकी ११ क्षेत्रीय निर्देशांक उंचावले. बांधकाम, भांडवली वस्तू, पोलाद, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन क्षेत्रातील समभागांचे मूल्य वधारले. स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे २.१३ व १.४७ टक्क्यांसह वाढले.
सेन्सेक्समधील २४ कंपनी समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये बजाज ऑटो, कोल इंडिया, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टीसीएस, एचडीएफसी, आयटीसी, टाटा स्टील, मारुती सुझुकी, हीरो मोटोकॉर्प, टाटा पॉवर, गेल इंडिया यांचा समावेश राहिला. ५.४८ टक्क्यांसह बजाज ऑटो आघाडीवर राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ५.६१ टक्क्यांसह बांधकाम निर्देशांक वरचढ ठरला. शुक्रवारच्या तुलनेत   बाजाराची उलाढाल मात्र ५ हजार कोटी रुपयांच्या आत राहिली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणांतून  पुढे आलेला मोदी सरकारचा आर्थिक कार्यक्रम
– महागाई नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य देणार
– विकासाचा वेग वाढविण्यासाठी उपाययोजना करणार
– वस्तू व सेवा कर अंमलबजावणीसाठी पुढाकार घेणार
– अति जलद रेल्वेचा सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प सुरू करणार
– छोटय़ा शहरांमध्ये कमी खर्चाचे विमानतळ उभारणार
– देशातील बंदरांना जोडण्यासाठी ‘सागर मेला’ प्रकल्प
– सागरी सुरक्षिततेकरिता राष्ट्रीय सागरी प्राधिकरणाची स्थापना
– गुंतवणूकपूरक वातावरण पूर्वपदावर आणणार
– व्यवसायपूरक वातावरणाची निर्मिती करणार
– थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार
– ग्रामीण-शहरी भेदभावासह गरिबीचे उच्चाटन करणार
– शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारी निराशावादी स्थिती नाहीशी करणार
– जल सुरक्षितता पुरविण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजना
– प्रत्येक राज्यात भारतीय तंत्रज्ञान संस्था व भारतीय व्यवस्थापन संस्था स्थापन करणार
– नवी आरोग्य योजना व राष्ट्रीय आरोग्य विमा मोहीम राबविणार
– राज्यातील राष्ट्रीय मुद्दय़ांसाठी राष्ट्रीय विकास परिषद व आंतर राज्य परिषद स्थापन करणार

विकास आणि विकासच..
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या तीन कारकिर्दीमध्ये विकासाद्वारे गुजरातचे नाव जगाच्या नकाशावर ठळकपणे उमटविणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा भारतासाठीचा आगामी कार्यक्रम पथदेखील याच विषयाभोवती केंद्रित असलेला दिसला. मोदी सरकारचा चेहरा स्पष्ट करणाऱ्या राबविणाऱ्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात विकासासाठी संबंधित योजनांचीच वाक्ये अधिक ठेवली. रस्ते, रेल्वे तसेच सागरी व हवाई मार्गाशी संबंधित विविध योजना जाहीर करताना राष्ट्रपतींनी अन्य पूरक पायाभूत सेवा क्षेत्रालाही हात घातला.
रस्ते मार्गाप्रमाणेच अति जलद रेल्वे सुवर्ण चतुष्कोन, कृषी उत्पादनांच्या वाहनासाठी विशेष कृषी रेल्वे, बंदरांना सागरी मार्गानेच जोडणारा ‘सागर मेला’ प्रकल्प, निम शहरांमध्ये कमी खर्चातील व छोटय़ा विमानतळांची बांधणी, सागरी सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय सागरी प्राधिकरणाची स्थापना, देशातील पायाभूत सेवा क्षेत्र अद्ययावत करणे, पायाभूत क्षेत्रात रेल्वेच्या संशोधन व विकासाला प्राधान्या देणे, उत्तरेतील दुर्गम भागात रेल्वेचे जाळे विस्तारणे आदींचा समावेश आगामी अंमलबजावणी कार्यक्रमात करण्यात आला आहे.

Story img Loader