सलग दुसऱ्या दिवशी नफेखोरी करत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्समध्ये सप्ताहअखेर १४९.५७ अंशांची घसरण नोंदविणे भाग पाडले. महिन्यातील सर्वात मोठी घसरण राखणारा मुंबई निर्देशांक यामुळे २२,३५९.५० वर थांबला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ४१.७५ अंश घट नोंदली गेल्याने हा निर्देशांक ६,६९४.३५ वर बंद झाला.
प्रमुख भांडवली बाजारांनी गुरुवारी गेल्या सलग आठ सत्रांनंतर घसरणीसह विश्राम घेतला होता. नव्या आर्थिक वर्षांतील पहिल्या आठवडय़ाची सुरुवात करताना सेन्सेक्स २२,५२२.४६ अशा वरच्या टप्प्यावर होता. मात्र लगेचच तो नकारात्मकतेत परिवर्तित झाला. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारांनी गुरुवारीही नव्या उच्चांकाला गवसणी घातल्यानंतर सत्राची अखेर नकारात्मक नोंदविली होती.
सर्वोच्च स्तरावर पोहोचलेल्या बाजारात नफेखोरी करण्याचा प्रयत्न गुंतवणूकदारांनी शुक्रवारी केला. या वेळी बाजारात माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, ऊर्जा क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी विक्री केली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये केवळ बांधकाम निर्देशांक घसरणीपासून वाचला. त्यात तब्बल ३.३ टक्क्यांची वाढ नोंदली गेली. तर सेन्सेक्समधील २५ कंपन्यांचे समभाग घसरले. त्यातही १.९ टक्क्यांसह भेल आघाडीवर राहिला.
रुपया २६ पैशांनी उंचावला!
डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी ८ पैशांनी उंचावला. निर्यातदार तसेच बँकांकडून अमेरिकी चलनाची नव्याने विक्री झाल्याने भारतीय चलन ६०.०८ पर्यंत वधारले. ५९.९० या स्थिर सप्ताह सुरुवातीनंतर गुरुवारच्या व्यवहारात रुपया २६ पैशांनी घसरला होता. त्याची सप्ताहअखेरची सुरुवातही ६०.२८ अशी नरम झाली. व्यवहारात तो ६०.३९ पर्यंत घसरला. दिवसअखेर मात्र तो भक्कम बनला. दरम्यान मुंबईच्या सराफा बाजारातील दरांची घसरण शुक्रवारीही राखली गेली. सोने तोळ्यामागे ४३ रुपयांनी कमी होत २८,३७४ रुपयांवर तर चांदीचा किलोचा भाव ३३२ रुपयांनी घसरत ४३,१६५ रुपयांवर स्थिरावला.