आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या शेवटच्या महिन्यात आघाडीच्या वाहन कंपन्यांना विक्रीतील घसरणीला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये देशातील क्रमांक एकच्या मारुती सुझुकी तर निर्यातीत वरचढ असणाऱ्या ह्य़ुंदाईचा समावेश आहे.
मारुती सुझुकी ही देशातील प्रवासी कार विक्रीतील पहिल्या क्रमांकाची कंपनी. मात्र तिनेही गेल्या महिन्यात एकूण विक्रीत १.६ टक्के घसरण नोंदविली. कंपनीच्या १,११,५५५ वाहनांची विक्री मार्चमध्ये झाली. वर्षभरापूर्वीच याच कालावधीत ती १,१३,३५० होती. कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री मात्र अवघ्या १.४ टक्क्यांनी वाढून १,०३,७१९ झाली आहे.
मूळची कोरियन ह्य़ुंदाई मोटर इंडिया ही निर्यातीतील अव्वल कंपनी समजली जाते. मात्र तिने या आघाडीवर तब्बल ३८.९ टक्के घसरण नोंदविली आहे. मार्च २०१४ मधील १६,७०५ वाहनांच्या तुलनेत ह्य़ुंदाईला यंदाच्या मार्च महिन्यात १०,२१५ वाहनांचीच भारताबाहेर रवानगी करता येऊ शकली आहे. कंपनीने एकूण विक्रीत ३.८ टक्के घसरण तर देशांतर्गत वाहन विक्रीत १२.९ टक्के वाढ राखली आहे.
फोर्ड इंडियाने एकूण विक्रीत सरलेल्या मार्चमध्ये ३३.६२ टक्के वाढ राखली आहे. कंपनीच्या १५,७७५ वाहनांची विक्री या महिन्यात झाली. कंपनीची देशांतर्गत विक्री मात्र तब्बल १७.३५ टक्क्यांनी रोडावली आहे. निर्यातीत मात्र तिने ९३ टक्के असा घसघशीत वाढीचा दर नोंदविला आहे.
अमेरिकेच्याच जनरल मोटर्सची गेल्या महिन्यातील देशांतर्गत विक्री आधीच्या ६,६०१ वरून ४,२५७ अशी ३५.५ टक्क्यांनी खाली आली आहे. तर जपानच्या होण्डाने भारतातील वाहन विक्री २३.१७ टक्के अधिक राखली आहे. कंपनीच्या २२,६९६ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली. एकूण आर्थिक वर्षांत होण्डाने ४०.७३ टक्के विक्री वाढ नोंदविली आहे.
सततच्या मासिक विक्री घसरणीचा क्रम राखणाऱ्या महिंद्र अॅण्ड महिंद्रची एकूण वाहन विक्री यंदा १२.४४ टक्क्यांनी घसरली आहे. वर्षभरापूर्वी ५१,६३६ वाहने विकणाऱ्या या कंपनीला यंदा ४५,२१२ वाहनांच्या विक्रीवर समाधान मानावे लागले आहे. कंपनीची देशांतर्गत विक्रीही मार्चमध्ये १५ टक्क्यांनी घसरली; तर निर्यात मात्र २८ टक्क्य़ांनी उंचावली. एकूण आर्थिक वर्षांत महिंद्रच्या वाहनांची विक्री ८ टक्क्य़ांनी घसरली आहे.
गेल्या महिन्यात नवीन व अद्ययावत प्रवासी वाहने सादर केल्याचा लाभ टाटा मोटर्सला मिळाला आहे. टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात १९ टक्क्यांनी वाढली आहे. मार्चमध्ये कंपनीच्या १५,०३९ कारची विक्री झाली. झेस्ट व बोल्ट या तिच्या नव्या गाडय़ा ३३ टक्क्यांनी वाढल्या. तर नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने अवघी ३ टक्के वाढ राखली आहे.
वार्षिक विक्रीत मात्र ‘मारुती’ झेप..
मारुती सुझूकीने २०१४-१५ वर्षांत ११.९ टक्के वाढीसह १२,९२,४१५ वाहनेविकली. हा विक्रीतील कंपनीचा नवीन
विक्रम असून, २०१०-११ सालात नोंदलेल्या १२,७१,००५ वाहनांच्या विक्रीला त्याने मागे टाकले आहे. आधीच्या २०१३-१४ सालात कंपनीला ११,५५,०४१ कारची विक्री शक्य झाली होती.