सूट-सवलतींची पाठ फिरल्यानंतर किंमतवाढीचा फटका; जानेवारीतील विक्रीत घसरण

सणांच्या जोडीने असलेल्या सूट – सवलतींचा वाहन क्षेत्रावरील हात अखेर नववर्षांरंभी सुटला आहे. जानेवारीपासून वाढलेल्या किंमतींचा फटका वाहन उत्पादक कंपन्यांना बसला आहे.

देशातील प्रमुख वाहन निर्मिती कंपन्यांची २०१६ च्या पहिल्या महिन्यातील विक्री त्यामुळे रोडावली आहे. आघाडीच्या मारुती सुझुकी, ह्य़ुंदाई मोटर इंडिया यांना त्याचा अधिक फटका बसला आहे.

डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत नफ्यातील वाढ नोंदविणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकी या कंपनीने गेल्या महिन्यात विक्रीतील २.६ टक्के घसरण नोंदविली आहे. कंपनीची जानेवारीतील एकूण विक्री १,१३,६०६ झाली आहे. कंपनीची देशांतर्गत विक्री किरकोळ वाढली आहे. तर निर्यात मात्र तब्बल ३४ टक्क्य़ांनी घसरली आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या व मारुतीची कट्टर स्पर्धक असलेल्या ह्य़ुंदाई मोटर इंडियालाही जानेवारीतील घसरणीचा फटका बसला आहे. कंपनीने १.२३ टक्के विक्रीतील घसरण नोंदविताना गेल्या महिन्यात ४४,२३० वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत किरकोळ वाढ झाली आहे; तर निर्यात मात्र ३७.८७ टक्क्य़ांनी कमी झाली आहे.

फोर्डच्या प्रवासी वाहनांची विक्री ४१.६४ टक्क्य़ांनी वाढून १२,८३४ झाली आहे. तर फोक्सव्ॉगननेही ७.६ टक्के विक्री वाढ राखताना ती गेल्या महिन्यात ४,०१८ नोंदविली आहे.

दुचाकीमध्ये इंडिया यामाहा मोटरने ४९.४२ टक्के वाढीसह ५८,७४३ वाहने विकली आहेत. तर याच क्षेत्रातील रॉयल एनफिल्डने ६५ टक्के वाढ राखताना जानेवारीतील दुचाकी विक्री ४७,७१० वर नेली आहे.

सणांच्या निमित्ताने वाहनांना दिले जाणाऱ्या सूट – सवलती डिसेंबर २०१५ मध्ये संपुष्टात येऊन जानेवारी २०१६ पासून अनेक कंपन्यांनी त्यांच्या विविध वाहनांच्या किंमती ५०,००० रुपयेपर्यंत वाढविल्या होत्या.

आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या संभाव्य स्थिर व्याजदरानंतरही वाहनासाठीचे कर्ज आदी स्वस्त होण्याची शक्यता धुसर असल्याने या उद्योगावरील कमी विक्रीचे मळभ काही महिने कायम राहण्याची शक्यता आहे.

चालू आठवडय़ात दिल्लीनजीक होऊ घातलेल्या वाहन मेळ्यासाठी सज्ज असलेल्या कंपन्यांना आता केंद्रीय अर्थसंकल्पातील या क्षेत्रासाठीच्या भरीव तरतुदींची अपेक्षा आहे.

महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, टाटा मोटर्सची आगेकूच

महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्राची विक्री मात्र ९.६ टक्क्य़ांनी वाढून जानेवारीत ४३,७८९ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत ४०,६९३ वाहने विकली. तर निर्यातीतही ७.३१ टक्के वाढ नोंदविली. कंपनीच्या एसयूव्ही, व्यापारी वाहने तसेच टॅक्टरच्या विक्रीत वाढ नोंदली गेली आहे.

टाटा मोटर्सची एकूण वाहन विक्री जानेवारीत १० टक्क्य़ांनी वाढून ४७,०३४ झाली आहे. यामध्ये प्रवासी तसेच व्यापारी वाहनांचा समावेश आहे. कंपनीची दोन्ही गटातील देशांतर्गत विक्रीही ७ टक्क्य़ांनी वाढून ४१,३९८ झाली आहे. कंपनीच्या निर्यातीत जानेवारीत ४२ टक्के वाढ नोंदली गेली आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या दहा महिन्यातील विक्री दोन टक्क्य़ांनी वाढली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही स्पर्धक वाहन कंपन्या घसरणीला सामोरे जात होत्या.