सप्टेंबरमध्ये मारुती, ह्य़ुंदाईच्या विक्रीत वाढ
दसरा, दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर वाहन उद्योगाने उत्साहजनक कामगिरी बजाविली आहे. मारुती, ह्य़ुंदाईसह यामाहा, रॉयल एन्फिल्स या दुचाकी तसेच आयशर मोटर्स, अशोक लेलॅन्डसारख्या व्यापारी वाहन उत्पादक कंपन्यांच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये वाढ झाली आहे.
रेपो दरातील अर्धा टक्का कपातीमुळे वाहनासाठीचे कर्जही स्वस्त होण्याचा मार्ग खुला झाला असतानाच येणाऱ्या काही दिवसांमध्ये वाहन विक्री अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. रिझव्र्ह बँकेच्या यंदाच्या पतधोरणातील आश्चर्यकारक घसघशीत दरकपातीचे तमाम वाहन उद्योगाने स्वागत केले आहे.
मारुती सुझुकीच्या विक्रीत यंदा एकूण अवघी ३.७ टक्के वाढ झाली आहे. देशातील सर्वात मोठय़ा कंपनीने सप्टेंबरमध्ये १,१३,७५९ वाहने विकली. तर देशांतर्गत विक्री ६.८ टक्क्यांने वाढून १,०६,०८३ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच सादर केलेल्या एस-क्रॉस वाहनाची ३,६०० विक्री झाली आहे.
ह्य़ुंदाई मोटर इंडिया कंपनीने यंदा कशी बशी दुहेरी आकडय़ानजीकची टक्केवारीतील वाढ राखली आहे. कोरियन कंपनीची सप्टेंबरमध्ये ५६,५३५ वाहने विकली गेली. वार्षिक तुलनेत ही वाढ ९.८३ टक्के आहे. एकेकाळी निर्यातीत आघाडी असलेल्या कंपनीची या क्षेत्रातील कामगिरी १४.६ टक्क्यांनी रोडावली आहे.
होन्डा कार्स कंपनीच्या विक्रीत सप्टेंबरमध्ये २३ टक्के वाढ होऊन कंपनीच्या १८,५०९ वाहनांची विक्री झाली आहे. स्पोर्ट युटिलिटी वाहन श्रेणीतील आघाडीच्या महिंद्र अॅन्ड महिंद्रला मात्र यंदा ५ टक्के घसरणीला सामोरे जावे लागले आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीची वाहन विक्री ४२,८४८ वर आली आहे. कंपनीची निर्यात वाढली असली तरी व्यापारी वाहनांची विक्री मंदावली आहे.
दुचाकीमध्ये यामाहा, रॉयल एन्फिल्ड यांनी यंदा विक्रीतील मोठी वाढ नोंदविली आहे. यामाहाच्या दुचाकी विक्रीचे प्रमाण १३.३८ टक्क्यांनी वाढून त्या ६७,२६७ विकल्या गेल्या आहेत. तर सप्टेंबरमध्ये निर्यातीत २९ टक्के वाढ झाली आहे. बुलेट ही लोकप्रिय नाममुद्रा असलेल्या रॉयल एन्फिल्डच्या सप्टेंबरमधील एकूण वाहनांची विक्री ५८.७८ टक्क्यांनी वाढून ४४,४९१ वर गेली.
वाहन कंपन्या सणांसाठी सज्ज
दसरा, दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर वाहन उद्योगाने उत्साहजनक कामगिरी बजाविली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 02-10-2015 at 07:58 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti hyundai lead domestic car sales in august