एप्रिलमध्ये उत्पादक कंपन्यांकडून वाहन मागणीची नोंद
देशातील वाहन उत्पादन उद्योगाची नवअर्थवाढ सकारात्मक नोंदली गेली आहे. एप्रिल २०१६ मध्ये मारुती, ह्य़ुंदाई, महिंद्रसह अधिक कंपन्यांनी वाहन विक्रीतील वाढ राखली आहे.
वाहन विक्रीत देशात सर्वात मोठय़ा असलेल्या मारुती सुझुकीने एप्रिलमध्ये विक्रीतील १३.३ टक्के वाढ राखली आहे. कंपनीच्या एकूण १,२६,५६९ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली. तर देशांतर्गत विक्री १६.२ टक्क्य़ांनी वाढून १,१७,०४५ झाली आहे. मारुतीच्या एरवीच्या पसंतीच्या अल्टो, व्हॅगनआरला मात्र यंदा धक्कादायक घसरणीला सामोरे जावे लागले आहे. कंपनीच्या कॉम्पॅक्टला तुलनेत अधिक तर ग्रॅण्ड व्हिटारा, एस-क्रॉस, ब्रिझा या नव्या वाहनांना तब्बल तिप्पट प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीची निर्यात मात्र दुहेरी आकडय़ात घसरली आहे.
मारुतीची कट्टर स्पर्धक कोरियन कंपनी ह्य़ुंदाई मोटर इंडियाने गेल्या महिन्यात अवघ्या ५.७ टक्क्य़ांची वाढ राखली आहे. तिची ५४,४२० वाहने एप्रिलमध्ये विकली गेली. कंपनीची भारतात ४२,३५१ वाहने विकली गेली आहेत. तर निर्यात मात्र ६.५ टक्क्य़ानी घसरली आहे. एकूणच वाहन क्षेत्र सध्या मंदीचा सामना करत असल्याचे मत यानिमित्ताने कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश श्रीवास्तव यांनी मांडले आहे. कंपनीने बाजारात नव्याने उतरविलेल्या क्रेटा, एलाईट आय२०ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
एसयूव्ही गटातील अव्वल महिंद्र अॅन्ड महिंद्रने १४ टक्क्य़ांची वाढ नोंदविली आहे. कंपनीच्या ४१,८६३ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली. स्थानिक पातळीवरही कंपनीला हाच प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीची निर्यात ११ टक्क्य़ांनी उंचावली आहे. व्यापारी वाहनांमध्येही याच प्रमाणात वाढ नोंदली गेली आहे. कंपनी नव्या वाहनांच्या जोरावर यापुढील कालावधीत अधिक वाहन विक्री वाढ राखेल, असे कंपनीच्या वाहन विभागाचे मुख्य कार्यकारी प्रवीण शाह यांनी म्हटले आहे.
फ्रेंच बनावटीच्या रेनो इंडियाने तर तिप्पट विक्री वाढीची मजल मारली आहे. कंपनीच्या १२,४२६ वाहनांची विक्री एप्रिलमध्ये झाली. वर्षभरापूर्वीच्या याच महिन्यात ती अवघी ४,००१ होती. कंपनीने छोटय़ा प्रवासी गटात सादर केलेल्या क्विड वाहनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे ही किमया साधता आली आहे. या वाहनाला महानगरांमधूनच नव्हे तर छोटय़ा शहरांमधूनही प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित साहनी यांनी म्हटले आहे.
दुचाकी निर्मिती क्षेत्रातील बजाज ऑटोने एप्रिलमध्ये अवघ्या २ टक्क्य़ांची वाढ नोंदविली आहे. कंपनीची गेल्या महिन्यातील विक्री २,९१,८९८ झाली आहे. कंपनीची निर्यातही तब्बल ३६ टक्क्य़ांनी घसरली आहे. ती वर्षभरापूर्वीच्या १,६१,५९८ वरून यंदा १,०३,९७६ झाली आहे. कंपनीच्या व्यापारी वाहनांची विक्री २४ टक्क्य़ांनी कमी झाली आहे. तर एकूण विक्री २ टक्क्य़ांनी घसरली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा