मारुती, ह्य़ुंदाईची विक्रमी मासिक विक्री प्रगतीनोंद
सणांचा हंगाम सुरू होणारा ऑक्टोबर भारतीय वाहन कंपन्यांसाठी यंदा वरदान ठरला आहे. देशातील आघाडीच्या मारुती, ह्य़ुंदाईसारख्या कंपन्यांनी या कालावधीत विक्रमी अशी मासिक वाहन विक्री नोंदविली आहे.

जपानी होन्डाबरोबरच यंदा महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, टाटा मोटर्स यांनीही वाहन विक्रीतील तेजी नोंदविली आहे. ऑक्टोबरच्या मध्याला आलेला दसरा सण याबाबत कंपन्यांच्या पथ्यावर पडला आहे. हा कल दिवाळीतील चालू नोव्हेंबरमहिन्यातही कायम राहण्याची शक्यता आहे.
वाहन विक्री व बाजारपेठ हिश्श्याबाबत अग्रस्थानी असलेल्या मारुती सुझुकीने ऑक्टोबरमध्ये २४.७ टक्के विक्री वाढ नोंदवित हा टप्पा १,२१,०६३ वर नेला आहे. कंपनीने गेल्या तिमाहीत दोन नवीन वाहने बाजारात आणली होती. अल्टो, व्ॉगन आरसारख्या छोटय़ा प्रवासी कार कंपनीच्या ५.२ टक्क्य़ांनी वाढल्या आहेत. तर स्विफ्ट इस्टिलो, रिट्झ, डीझायर या वाहनांच्या विक्रीचे प्रमाण ३७.७ टक्क्य़ांनी उंचावले आहे. यात गेल्या महिनाअखेर सादर करण्यात आलेल्या बलेनोचाही समावेश आहे.
स्पर्धक ह्य़ुंदाई मोटर कंपनीच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये २३.७ टक्के वाढ होऊन कंपनीची वाहन विक्री ४७,०१५ झाली आहे. ग्रॅण्ड आय१०, नवी क्रेटा, एलाईट आय२० या वाहनांच्या जोरावर कंपनीने महिन्यातील सर्वोत्तम विक्री नोंदविली आहे. होन्डाने ५२ टक्के विक्रीतील वाढ नोंदवित ऑक्टोबरमध्ये २०,१६६ वाहनांचा टप्पा गाठला आहे. कंपनीची वर्षभरापूर्वी, याच महिन्यातील विक्री १३,२४२ होती.
गेल्या काही महिन्यांपासून विक्रीतील घसरणीचा सामना करावे लागणाऱ्या महिंद्र आणि टाटा समूह यांनी यंदाच्या ऑक्टोबरमध्ये वाढ राखली आहे. महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रच्या विक्रीत २१ टक्के वाढ होत ती ४८,८१५ झाली आहेत. एक्सयूव्ही५००, स्कॉर्पिओ, बोलेरोच्या माध्यमातून एसयूव्हीत आघाडीवर असणाऱ्या महिंद्रूने यंदाच्या हंगामातच टीयूव्ही३०० हे कॉम्पॅक्ट एसयूव्ही वाहन सादर केले होते.
टाटा मोटर्सची देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री ११ टक्क्य़ांनी वाढून १२,७९८ झाली आहे. टाटा मोटर्सची देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री ११ टक्क्य़ांनी वाढली आहे.

प्रवासी वाहन विक्री
भारतीय दुचाकी बाजारपेठेतील इंडिया यामाहा, (२९.४३ टक्के वाढ, ७०,८०० विक्री), बजाज ऑटो (८.५९ टक्के घट, ३,५२,८२२ विक्री), होन्डा (१९.१ टक्के वाढ, ४,४९,०२८ विक्री) यांचेही वाहन विक्रीचे आकडे सोमवारी जाहीर झाले. यामाहा इंडियाने सण कालावदीत चार नव्या दुचाकी सादर केल्या होत्या. होन्डा दुचाकीच्या मोटरसायकल गटात घसरण तर स्कूटर श्रेणीत यंदा वाढ झाली आहे.

Story img Loader