देशातील अग्रेसर कार निर्मात्या मारुती-सुझुकी सरलेल्या २०१४-१५ वर्षांत १२ टक्क्यांच्या वाढीसह आजवरची सर्वाधिक १२,९२,४१५ कारची वार्षिक विक्री साधणाऱ्या मारुती-सुझुकीने, नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यात विक्रीत दमदार २९.६ टक्क्यांच्या वाढीने सुरुवात केली. एप्रिल २०१५ मध्ये मारुतीच्या १,११,७४८ कार विकल्या गेल्या, ज्याचे प्रमाण गतवर्षी याच महिन्यात ८६,१९६ असे होते. मारुतीने तीन दिवसांपूर्वी आपली आर्थिक कामगिरी जाहीर केली असून ३,७११.२० कोटी रुपयांचा विक्रमी वार्षिक नफा कमावल्याचे स्पष्ट केले आहे.
उल्लेखनीय म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला जाहीर होणाऱ्या वाहन निर्मात्यांच्या आदल्या महिन्यातील विक्री कामगिरीत, मारुती सुझुकी वगळता अन्य कोणत्याही कार निर्मात्याला मारुतीच्या बरोबरीची कामगिरी करता आलेली नाही. मारुतीची एप्रिलमधील देशांतर्गत विक्री २७.३ टक्क्यांनी वाढली आहे. त्यात अल्टो व व्ॉगनआर या छोटय़ा कारचे सर्वाधिक योगदान असून, त्यांची विक्री ३५.९ टक्क्यांनी वाढून ३५,४०३ इतकी आहे. तिच्या स्विफ्ट, एस्टिलो, रिट्झ, डिझायर या कॉम्पॅक्ट श्रेणीतील कारची विक्री मात्र ८.७ टक्क्यांनी वाढून ३८,९२६ च्या तुलनेत ४२,२९७ वर गेली आहे. त्याउलट जिप्सी, ग्रॅण्ड व्हिटारा आणि अर्टिगा या चारपेक्षा अधिक आसने असलेल्या युटिलिटी वाहनांची विक्री ११.२ टक्क्यांनी घटली आहे. तर ओम्नी, इको या व्हॅन श्रेणीतील वाहनांची विक्री ४५ टक्क्यांनी वाढून एप्रिल २०१५ मध्ये १२,०६९ इतकी आहे. सरलेल्या एप्रिलमध्ये कंपनीच्या वाहनांची निर्यात ५६ टक्क्यांनी वाढली आहे. या महिन्यात तिने ११,०३९ वाहनांची निर्यात केली.
होंडाच्या विक्रीत १४ टक्क्यांची वाढ
होंडा कार्स इंडियाने सरलेल्या एप्रिलमध्ये १२,६३६ कारची देशांतर्गत विक्री साधली. एप्रिल २०१४ मध्ये विक्रीचे प्रमाण ११,०४० इतके होते, त्या तुलनेत यंदा १४ टक्क्यांची समाधानकार वाढ तिने अनुभवली आहे. यात सर्वाधिक योगदान मिड-साइझ श्रेणीतील होंडा सिटी (८,२०३) आणि छोटेखाने ब्रियो (२,८६२) चे राहिले आहे.
महिंद्रला विक्रीत अवघी १ टक्का वाढ
महिंद्र अँड महिंद्रला वाहनांच्या श्रेणीत सरलेल्या एप्रिलमध्ये अवघी १ टक्का वाढ साधता आली. एप्रिल २०१४ मधील ३६,२८८ विकल्या गेलेल्या वाहनांच्या तुलनेत तिने यंदाच्या एप्रिलमध्ये ३६,७२७ वाहनांची विक्री केली. यात कंपनीच्या प्रवासी आणि वाणिज्य चार चाकी वाहनांचे जवळपास सारखेच म्हणजे अनुक्रमे १८,३१४ आणि ११,६७७ असे योगदान आहे.
ह्य़ुंडाईच्या विक्रीत २.६ टक्क्यांची वाढ
देशातील दुसऱ्या क्रमांकाची कार निर्माती कंपनी ह्य़ुंडाई मोटर इंडियाने एप्रिल २०१५ मध्ये विक्री ५१,५०५ गेल्याचे म्हटले आहे. एप्रिल २०१४ मधील ५०,२२२ विक्रीच्या तुलनेत ती यंदा २.६ टक्क्यांनी वाढली आहे.
तर निर्यातीत कायम अग्रेसर असलेल्या या कंपनीला सरलेल्या एप्रिलमध्ये मात्र निर्यात १३.८ टक्क्यांनी घटल्याचे पाहावे लागले आहे. देशांतर्गत विक्रीतील ९.५ टक्क्यांच्या वाढीनेच, तिच्या एकूण विक्रीत २.६ टक्क्यांची वाढ संभवली आहे.
जनरल मोटर्सच्या विक्रीत ३२ टक्क्यांची घट
जनरल मोटर्स इंडियाची एप्रिल २०१५ मधील विक्री ३१.८७ टक्क्यांनी घटून ३,६१२ वर स्थिरावली आहे. गतवर्षी याच महिन्यात कंपनीची ५,३०२ कार अशी विक्री कामगिरी होती.

Story img Loader