भारतीय वाहन उद्योगामागे लागलेले शुक्लकाष्ट अद्याप सरलेले नसल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या एप्रिल २०१४ महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. लक्षणीय म्हणजे प्रवासी वाहनांच्या बाजारातील अग्रणी मारुतीसह टाटा मोटर्स, महिंद्र अॅण्ड महिंद्र या देशी निर्मात्यांच्या विक्रीला घरघर लागली आहे, तर जनरल मोटर्स आणि ह्य़ुंडाई वगळता अन्य विदेशी निर्मात्यांच्या विक्रीत वाढीचा बहर कायम असल्याचे दिसले आहे.
मारुती सुझुकीने एप्रिलमधील वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षांतील एप्रिलच्या तुलनेत ११.४ टक्क्य़ांनी घट झाल्याचे दर्शविले आहे. सलग दोन वर्षे विक्रीत घटीशी झुंजत असलेल्या या कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दरसाल लाखभर वाहने विकण्याचा प्रघात तोडून ९७,३०२ वाहनांची विक्री नोंदविली होती, ती यंदाच्या एप्रिलमध्ये आणखी घटून ८६,१९६ वर ओसरल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गंभीर बाब म्हणजे मार्च २०१४ मध्ये मारुतीने १,१३,३५० असा वाहन विक्रीचा आकडा गाठला होता, त्या तुलनेत या महिन्यात विक्री तब्बल २४ टक्क्य़ांनी घसरली आहे.
मारुतीसाठी उजवी बाब म्हणजे, तिने कॉम्पॅक्ट क्षेत्रात नव्याने बाजारात उतरविलेल्या ‘सेलेरियो’ने विक्रीत मासिक १० टक्क्य़ांची वाढ कायम ठेवली आहे. स्विफ्ट, एस्टिलो, रिट्झ या अन्य मॉडेल्सची विक्रीही याच दराने वाढली आहे. त्या तुलनेत या आधी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या ‘डिझायर’ची विक्री सलग दुसऱ्या महिन्यात घसरली आहे. एप्रिल २०१४ मध्ये तर विक्रीत घसरणीचे वर्षांगणिक प्रमाण १७.७ टक्के इतके भयानक आहे. एम ८००, अल्टो, ए-स्टार आणि व्ॉगन आर या मिनी कारच्या विक्रीतील घसरण, तर २५.४ टक्के इतकी आहे.
मारुतीप्रमाणेच महिंद्र अॅण्ड महिंद्रच्या वाहनांची एप्रिलमधील विक्री १२ टक्क्य़ांनी घटून ३६,२७४ वर सीमित राहिली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीचे विक्रीचे प्रमाण ४१,४३२ असे होते. ह्य़ुंडाईच्या विक्रीतही ११.८१ टक्क्य़ांची घसरण होऊन ती ५६,९५३ वरून ५०,२२२ वर उतरली आहे. लक्षणीय म्हणजे भारतातून कार निर्यातीत अग्रस्थानी असलेल्या या कंपनीची एप्रिलमधील निर्यातही ३९ टक्क्य़ांनी ओसरली असून, ती २४,५५० स्तरावरून १४,९७४ वर रोडावली आहे. जनरल मोटर्सची विक्री ३५ टक्क्य़ांनी घटून, गेल्या वर्षीच्या एप्रिलमधील ८,१९६ वरून ५,३०२ वर ओसरली आहे.
होंडाच्या वाहनांची विक्री मात्र एप्रिल २०१४ मध्ये ३० टक्क्य़ांनी वधारली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये होंडाची ८,४८८ वाहने विकली गेली होती, हे प्रमाण यंदा ११,०४० वर गेले आहे. बरोबरीने यामाहा मोटर या जपानी दुचाकी निर्माता कंपनीने सरलेल्या एप्रिलमध्ये दमदार ४२.३९ टक्क्य़ांची विक्रीत वाढ नोंदविली आहे. चालू वर्षांच्या प्रारंभी ‘ऑटो एक्स्पो’दरम्यान यामाहाने प्रस्तुत केलेली ‘अल्फा’ या बाइकने ही किमया साधली आहे. परिणामी, एकूण दुचाकी विक्री गेल्या वर्षीच्या एप्रिलमधील ३५,९२७ वरून यंदा ५१,१५८ वर पोहोचली आहे.
कार विक्रीला एप्रिलमध्ये पुन्हा घरघर
भारतीय वाहन उद्योगामागे लागलेले शुक्लकाष्ट अद्याप सरलेले नसल्याचे त्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या एप्रिल २०१४ महिन्यातील विक्रीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते.
First published on: 02-05-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maruti suzuki toyota mahindra mahindra sales drop in april hyundai honda up