पंधरवडय़ावर येऊन ठेपलेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणातू संभाव्य व्याजदर कपातीकडे उद्योगक्षेत्राचे डोळे लागलेले असताना, देशातील सर्वात मोठय़ा बँकेला मात्र तशी आशा नाही.
स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी आपल्या मताचे समर्थन करताना स्पष्ट केले की, जूनमधील घाऊक किंमत निर्देशांक उणे स्थितीत राहिला आहे; मात्र त्याच महिन्यातील किरकोळ महागाई दर किरकोळ वाढला आहे. मुख्यत्वेकरून अन्नधान्यांच्या किमती वाढल्याने यंदा महागाई वाढल्याचे दिसून येते. रिझव्‍‌र्ह बँकेसाठी व्याजदर निश्चितीकरिता किरकोळ महागाई दर खूपच महत्त्वाचा ठरतो. तेव्हा त्यातील गेल्या महिन्यातील वाढ पाहता मध्यवर्ती बँक व्याजदर कपात करेल, असे आपल्याला वाटत नाही, असे भट्टाचार्य म्हणाल्या.
रिझव्‍‌र्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण येत्या ४ ऑगस्ट रोजी जाहीर होत आहे. जूनमधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ५.४ टक्के असा गेल्या आठ महिन्यांच्या उच्चांकावर राहिला आहे. तर किरकोळ महागाई दर सलग सहाव्या महिन्यात उणे स्थितीत राहताना उणे २.४ टक्के नोंदला गेला आहे.
मेमधील औद्योगिक उत्पादन दर घसरल्याने उद्योग क्षेत्राकडून व्याजदर कपातीसाठी दबाव वाढत आहे. अर्थतज्ज्ञ, पतमानांकन संस्थांकडून मात्र यंदा किमान पाव टक्के दर कपातीचा अंदाज बांधला जात आहे. जानेवारी २०१५ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने प्रत्येकी पाव टक्का अशी तीन वेळा दर कपात केली आहे. चांगल्या मान्सूनच्या जोरावर व्याजदर कपातीचा विचार केला जाऊ शकतो, असे संकेत गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिले होते.

वार्षिक नफ्यातील ३ टक्के लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे. यासाठी बँकेने अर्थ खात्याची परवानगी मागितल्याचे बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले. स्टेट बँकेच्या प्रतिभा धारणा व प्रेरणा उपक्रमांतर्गत ही मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत भट्टाचार्य म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांना वाटत असलेली आव्हाने पेलावयाची असतील तर त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. आणि नफ्यातील हिस्सा त्यांना देण्यामागे हाच हेतू आहे. एक टक्क्य़ापर्यंतचा लाभ सरकारच्या परवानगीने देऊ शकतो; मात्र आम्ही ३ टक्के लाभासाठी परवानगी मागितली आहे. वरिष्ठ तसेच मध्यम पदावरील व्यक्तींसाठी हे खूपच आवश्यक आहे; खासगी बँकांच्या तुलनेत या पदावरील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक बँकेत कमी वेतन आहे, असेही बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले. मार्च २०१५ अखेर बँकेने मिळविलेल्या नफ्याची रक्कम १३,१०१.५७ कोटी रुपये असून देशातील सर्वात मोठय़ा बँकेत आजमितीस २.३० लाख कर्मचारी आहेत.

Story img Loader