सोशल नेटवर्किंग साइटवरून केलेले वैयक्तिक मतप्रदर्शन अनेकांना प्रसंगी कायदेशीर सामना करण्यासही भाग पाडते. मात्र कामकाजाच्या बाबतीतील आपले मत एका कॉर्पोरेट महिलेच्या अंगाशी आले आहे.
देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या इन्फोसिसच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तरुण व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन त्याविषयी ट्विटरवरून दिलेला अभिप्राय आघाडीच्या उद्योजिका किरण मुझुमदार-शॉ यांना अखेर मागे घ्यावा लागला आहे.
इन्फोसिसच्या संचालक मंडळाची बैठक शनिवारी बंगळुरू येथे झाली. या बैठकीला कंपनीचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांचे चिरंजीव रोहन मूर्ती यांनी संबोधित केले. संचालक मंडळाला मार्गदर्शन करताना रोहन यांनी अनोखे सादरीकरण सादर केले. त्याचीच स्तुती किरण यांनी लगेच ट्विटरवरून केली. त्याला १९ जणांनी ‘रिट्विट’ही केले. ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रोहन यांनी केलेले सादरीकरण उत्तम होते. याचा लाभ इन्फोसिसला भविष्यात नक्कीच होईल’ असे त्यांनी ट्विट केले. किरण यांचे ट्विटरवर १.१९ लाख ‘फॉलोवर’ आहेत.
किरण यांनी बुधवारी आपल्या या जाहीर मतप्रदर्शनाबद्दल माफी मागितली आहे. तत्पूर्वी त्यांच्या या मताबद्दल कॉर्पोरेट विश्वातून काहीशी नाराजी व्यक्त केली गेली होती. एखाद्या कंपनीच्या संचालक मंडळातील विषय, चर्चा हे गोपनीय असतात; तेव्हा ते जाहीर होणे गैर असते, असा मतप्रवाह उद्योजकांमध्ये असतो.
किरण मुझुमदार-शॉ यांची इन्फोसिसच्या संचालक मंडळावर डिसेंबर २०१३ मध्ये नियुक्ती झाली. जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील बायोकॉनच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकदेखील आहेत. इन्फोसिसमध्ये नारायण मूर्ती परत आल्यानंतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अशा स्थितीत कंपनीच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. त्यातच रोहन यांच्याबद्दल किरण यांनी व्यक्त केलेले मत कंपनीवर वेगळाच प्रभाव पाडू शकते, असा एक कल उद्यम वर्तुळात आहे.

 

Story img Loader