कपडय़ांपासून मोबाइल, वाहन ते थेट घरे आदी सर्व ई-कॉमर्सच्या व्यासपीठावर उपलब्ध होत असताना त्यात आता अत्यावश्यक औषधांनीही आघाडी घेतली आहे. ऑनलाइन औषध खरेदीची संधी देशात प्रथमच उपलब्ध होत असून, त्याची सुरुवात आर्थिक राजधानीतून झाली आहे.
‘केमिस्टऑनलाइन.इन’च्या व्यासपीठावर विविध औषधे व सर्वसाधारण जीवनोपयोगी वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी विविध एक लाखांहून अधिक औषधे व २५ हजारांहून अधिक वस्तू या संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदीची संधी मुंबईकरांना देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर उत्पादनांचे, औषधांचे विविध विभाग करण्यात आले असून, औषधाचे नाव अथवा कंपनीचे नाव टाकूनही हवे ते उत्पादन शोधण्याचा पर्याय यावर आहे. ही सेवा तूर्त मुंबईतच असून १००० रुपयांवरील औषधे ही घरपोच दिली जात आहेत.
‘केमिस्टऑनलाइन.इन’च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता मेहता यांनी सांगितले, की गतिमान जीवनशैलीत आवश्यक औषधे वेळेवर मिळणे अत्यंत गरजेचे आहे. वाढणारे आजार आणि तुलनेत कमी उपचारांसाठी हे व्यासपीठ आवश्यकच होते.
ऑनलाइन औषध खरेदीसाठी संबंधित औषधाची प्रमाणित प्रत  (प्रिस्क्रिप्शन) संकेतस्थळावर नोंदवावी लागणार असून, शहानिशेनंतरच औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. नेहमीच्या औषधांव्यतिरिक्त आरोग्यनिगा क्षेत्रातील अन्य वस्तूही या व्यासपीठावर उपलब्ध आहेत.
औषध क्षेत्रासाठी स्वतंत्र खाते!
नवी दिल्ली: देशातील औषध निर्मिती क्षेत्राच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र खाते तयार करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. औषध नियंत्रण, औषध किंमत निश्चिती तसेच वैद्यकीय उपकरणे हे विभाग एकाच खात्यांतर्गत आणण्याची तयारी सुरू आहे.
औषध निर्मिती क्षेत्रावर सध्या विविध नियामकांद्वारे आणि रसायन व आरोग्य खात्यांतर्गत नियंत्रण राखले जाते. औषधाशी संबंधित दर्जा नियंत्रण, औषध नियंत्रण तसेच नव्या औषधांची परवानगी, आयात औषधे याबाबत आरोग्य खाते निर्णय घेते. तर औषधांची किंमत निश्चिती रसायन व खते विभागांतर्गत येतात. औषध क्षेत्राशी संबंधित सर्व विभाग, नियामक यंत्रणा एकाच खात्यांतर्गत आणण्याचा सरकारचा विचार असल्याचे केंद्रीय खतमंत्री अनंत कुमार यांनी गुरुवारी सांगितले. याबाबत आपण स्वत: या खात्याचे  राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह पंतप्रधानांना भेटणार आहोत, असेही ते म्हणाले. देशातील औषध क्षेत्र हे १.८० लाख कोटींचे असून नव्या खात्यात वैद्यक उपकरणांचाही समावेश केला जाऊ शकेल.

Story img Loader