जर्मन आलिशान प्रवासी कार बनावटीच्या मर्सििडझ-बेंझ इंडियाने आपल्या जीएलए एसयूव्ही या गाडीच्या निर्मितीला पुणे येथील उत्पादन केंद्रामध्ये सुरुवात केली. याद्वारे मर्सििडझ-बेंझ पहिल्यांदाच जर्मनीबाहेर आपल्या कॉम्पॅक्ट कारबरोबरच सेदान आणि एसयूव्ही गाडय़ांची निर्मिती आपल्या नवीन जागतिक जुळणी (असेम्ब्ली) प्रकल्पातून स्थानिक पातळीवर करीत आहे. परिपूर्ण स्वरुपात स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले कंपनीचे हे सहावे वाहन आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या आलिशान श्रेणीतील स्पर्धक वाहन निर्मात्यांना या आघाडीवर मर्सििडझ-बेंझने मात दिली आहे.
भारतातल्या मर्सििडझ-बेंझच्या या जुळणी प्रकल्पाखेरीज या नेटवर्कमध्ये थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया या देशांमधील प्रकल्पांचाही समावेश असून २०१६ मध्ये त्यात ब्राझीलही सहभागी होणार आहे. सध्या ब्राझीलमधला नवा असेम्ब्ली प्रकल्प निर्मितीच्या अवस्थेत आहे. नव्या जीएलए ची किंमत ही आयात करण्यात येत असलेल्या ३१.३१ ते ३४.२५ लाख रुपयांच्या तुलनेत दिड ते अडिच लाख रुपयांनी स्वस्त आहे.
पुणे येथील जुळणी प्रकल्पामधून वर्षांला २०,००० गाड्या बनवण्याची क्षमता आहे. त्यासाठी आतापर्यंत १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मर्सििडझ-बेंझच्या या नव्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले आणि त्यांनी मर्सििडझ-बेंझने पुण्यात बनवलेली पहिली जीएलए कार चालवूनही पाहिली. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मर्सििडझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एबरहार्ड कर्न आणि मर्सििडझ-बेंझ इंडियाच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक पीयुष अरोरा उपस्थित होते.
किंमतीत अडीच लाखांचा फरक
*परिपूर्ण स्वरुपात स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले जीएलए एसयूव्ही हे मर्सििडझ-बेंझचे सहावे वाहन आहे. याची किंमत ही आयात करण्यात येत असलेल्या ३१.३१ ते ३४.२५ लाख रुपयांच्या तुलनेत दीड ते अडीच लाख रुपयांनी स्वस्त आहे.