आपण खरेदी करत असलेली मोटार फक्त आणि फक्त आपल्यासाठीच तयार करण्यात आली असल्याचा अनुभव ग्राहकांना मिळावा यासाठी आलीशान मोटारींच्या कंपन्या आपल्या ‘कस्टमाईज्ड’ सेवांचा विस्तार करत आहेत. ‘एक तंत्रज्ञ- एक इंजिन’ ही कल्पना लोकप्रिय करणाऱ्या ‘मर्सिडीज बेंझ एएमजी’ने त्यांचे देशातले पाचवे केंद्र पुण्यात सुरू केले आहे. राज्यात पुण्याव्यतिरिक्त केवळ मुंबईत असे केंद्र आहे.
जर्मनीतील अफाल्टरबाखमधील उत्पादन केंद्रात प्रत्येक इंजिनाची स्वतंत्रपणे एकाच तंत्रज्ञाकडून केली जाणारी बांधणी हे मर्सिडीझ एएमजीचे वैशिष्टय़ समजले जाते. कंपनीच्या ज्या तंत्रज्ञाने ते इंजिन बनवले    असेल त्याची सही देखील इंजिनावर असते.
या श्रेणीतली मोटार विकत घेणाऱ्यांना विशिष्ट प्रकारच्या रेस ट्रॅकवर मोटार फिरवण्यासारख्या इतर उपक्रमातही सहभागी होण्याची संधी मिळते. देशातील एएमजी केंद्रांमधील विक्री तज्ज्ञांनाही मोटारीच्या विविध वैशिष्टय़ांविषयी माहिती देण्यासाठी परदेशी प्रशिक्षण दिले जाते.
‘मर्सिडीझ बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक एबरहार्ड केर्न यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकार परिषदेत या केंद्राची घोषणा केली. बंडगार्डन रस्त्यावरील बी. यू. भंडारी मोटर्स येथे हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केर्न म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी कंपनीने ४७,६०० एएमजी मोटारींची विक्री केली असून त्यातील भारतात विकल्या गेलेल्या मोटारींची संख्या तीन आकडी होती.
या श्रेणीतील मोटारींची किंमत ७० लाख रुपयांपासून सुरू होते. अफाल्टरबाख येथील कारखान्यात इंजिन निर्मितीसाठी १५० तंत्रज्ञ आहेत. यात एका भारतीय तंत्रज्ञाचाही समावेश आहे. इंजिन ज्या प्रकारचे असेल त्यानुसार प्रत्येक तंत्रज्ञ दिवसाला १ ते ३ इंजिने बनवतो.’’   

Story img Loader