येत्या जूनपासून ध्वनिसेवाही सुरू करण्याचे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप ‘व्हॉट्स अ‍ॅप’च्या सूतोवाचने प्रस्थापित दूरसंचार सेवा कंपन्यांमध्ये घबराट निर्माण केल्याचा प्रत्यय ‘एअरटेल’ने या अ‍ॅप्सवर काही ठोस नियमन आणि कार्यक्षेत्राचे बंधन असावे अशी मागणी करून दिला.
दूरसंचार कंपन्यांवर जसा नियंत्रक आहे, तसे व्हॉट्स अ‍ॅप, लाइन, स्काइप यांच्यावर नियंत्रकाच्या कक्षेत आणावे, असे मत भारती एअरटेलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि भारतातील मुख्याधिकारी गोपाळ विठ्ठल यांनी बार्सिलोना येथे वृत्तसंस्थेशी बोलताना  व्यक्त केले.
सध्याच्या घडीला ही सर्वच मेसेजिंग अ‍ॅप्स मोकाट आहेत आणि दूरसंचार कंपन्यांवर मात्र नियमांचे बंधन असणे हे समन्यायी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हॉट्स अ‍ॅप देशात सध्याच्या ४५ कोटी वापरकर्ते असून, प्रतिदिन सरासरी १० लाखांची त्यात भर पडत आहे, तर एअरटेलने अलीकडेच ग्राहकसंख्येत २० कोटींचा टप्पा पार केला आहे. स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अ‍ॅप सुविधेतून फोनधारक विशिष्ट शब्दमर्यादेत संदेशच नव्हे तर सोबत छायाचित्र आणि व्हिडीओही क्षणाचाही विलंब न लावता अनेकांना सामान्य एसएमएस संदेशासाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत अल्पखर्चात पाठवू शकतो. त्यामुळे आधीच प्रस्थापित मोबाइल कंपन्यांच्या टेक्स्ट मेसेजिंग (एसएमएस) महसुलाला कात्री बसली असताना, फेसबुकच्या छायेत गेल्याने आर्थिक संपन्नता वधारलेल्या व्हॉट्स अ‍ॅपने आता ध्वनिसेवा सुरू करण्याची घोषणा करून प्रस्थापितांना मोठय़ा दणक्याचीच तयारी सुरू केली आहे. आजच्या घडीला मोबाइल सेवा प्रदात्यांचा ७५% महसूल हा ध्वनिसेवा आणि टेक्स्ट मेसेजिंग यामधून मिळत असतो.

Story img Loader