सेन्सेक्स २८६ अंशांनी गडगडला
दर स्थिरतेचे रिझव्र्ह बँकेचे पतधोरण मंगळवारी बाजाराच्या पसंतीस उतरले नाही. त्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या दरातील पुन्हा सुमारे ३ टक्क्यांच्या घसरणीने चिंतेत भर घातल्याच्या परिणामी सेन्सेक्स २८६ अंशांनी गडगडून २४,५३९ वर विसावला.
रिझव्र्ह बँकेने आपले महत्त्वाचे धोरण दर कायम ठेवत, केंद्र सरकारच्या कोर्टात चेंडू लोटण्याची भूमिकेबाबत बाजारात स्पष्ट नाराजी दिसून आली. विशेषत: महागाई दरात आणि वित्तीय तुटीत वाढीबाबत पतधोरणाने केलेले भाष्य बाजाराने गांभीर्याने घेतले, असे विश्लेषकांनी सूचित केले.
सेन्सेक्सने सोमवारच्या तुलनेत काहीशी वाढ नोंदवीत २४,८६८ अंशांवर दिवसाची सुरुवात केली आणि प्रत्यक्ष पतधोरण मांडून गव्हर्नर रघुराम राजन यांची पत्रकार परिषद सुरू असताना, सेन्सेक्सने २४,९२८.७५ या दिवसांतील उच्चांकापर्यंत मजल मारली होती; परंतु खनिज तेलाच्या किमतींनी दोन दिवस सुधारणा दाखविल्यानंतर, मंगळवारी पुन्हा कच खाल्याच्या परिणामी युरोपातील बाजार मोठय़ा घसरणीसह खुले झाले. दुपारी मध्यान्हीच्या समयी त्याचे स्थानिक बाजारात पडसाद उमटले आणि सेन्सेक्स त्या समयी ३५० अंशांपर्यंत गडगडल्याचे दिसून आले. २४,५०० खाली सेन्सेक्सची २४,४६० या दिवसातील नीचांकापर्यंत घसरगुंडी उडाली होती. मंगळवारच्या घसरणीच्या परिणामी निफ्टी निर्देशांकानेही ७५०० ची पातळी तोडून १००.४० अंश खाली ७,४५५.५५ वर विश्राम घेतला. निफ्टी निर्देशांक एके समयी ७.४२८.०५ म्हणजे दीड टक्क्यांहून अधिक गडगडला होता. तेलाच्या दरातील अस्वस्थतेपायी बाजारातील तेल व वायू निर्देशांकाने सर्वाधिक २.५९ टक्क्यांचे नुकसान दर्शविले. खालोखाल पायाभूत सोयीसुविधा (२.५० टक्के), सार्वजनिक उपक्रम (२.४५ टक्के), ऊर्जा क्षेत्र (२.४२ टक्के), स्थावर मालमत्ता (१.७१ टक्के), बँकिंग (१.६८ टक्के) आणि वाहन उद्योग(१.३९ टक्के) असे मुख्य क्षेत्रीय निर्देशांक नुकसानीत राहिले.
रुपयाच्या मूल्याबाबत चिंता नाही – राजन
रुपयाचे विद्यमान विनिमय मूल्य ही फार चिंतेची बाब नसली तरी मध्यवर्ती बॅंक आवश्यक तो हस्तक्षेप करून डॉलरची खरेदी करेल, असे रघुराम राजन यांनी मंगळवारी सांगितले. ते पतधोरण मांडत असताना रुपया प्रति डॉलर ६८ च्या वेशीवर पोहचला होता. दिवसअखेर डॉलरमागे आणखी १४ पैसे गमावून तो ६७.९८ पातळीवर विसावला.