जगातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी सोमवारी कंपनीच्या हैदराबाद येथील कार्यालयाला भेट देत कंपनीच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
मायक्रोसॉफ्टचे अमेरिकेनंतरचे हैदराबाद येथील विकास केंद्र हे सर्वात मोठे आहे. सत्या यांनी या वेळी कर्मचाऱ्यांसमोर कंपनीच्या आगामी प्रवासाबाबत आपली ध्येयधोरणे विशद केली.
हैदराबादचाच जन्म असणाऱ्या सत्या यांनी कंपनीच्या सर्वोच्च पदावर फेब्रुवारीमध्ये नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच हैदराबादमध्ये पाऊल ठेवले. सरकारी सूत्रांनुसार, सत्या यांनी रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचीही भेट घेतली होती. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्कही साधला. माहिती तंत्रज्ञानातील उद्योजकांची शिखर संघटना असलेल्या ‘नॅसकॉम’च्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी सत्या हे दिल्लीलाही जाणार आहेत.
सत्या यांनी गेल्याच आठवडय़ात चीनलाही भेट दिली होती. अमेरिका-चीनमधील संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर त्यांची चीन भेट चर्चेत होती. कंपनीच्या विण्डोज आणि ऑफिस सूट सॉफ्टवेअरबाबत चीनने जुलैमध्ये चौकशी केली होती. तसेच सुरुवातीच्या र्निबधानंतर मुभा देण्यात आलेले मायक्रोसॉफ्टचे एक्सबॉक्स वन हे खेळविषयक सॉफ्टवेअर चीनमध्ये सादर होणार आहे. तब्बल चौदा वर्षांनंतर बंदी उठविल्याने चीनमध्ये प्रथमच अमेरिकन कंपनीला व्यवसाय विस्तारास वाव मिळाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा