स्मार्टफोनची चिवट स्पर्धा आणि परिणामी अव्वलस्थान गमावलेल्या नोकियाने अखेर हॅण्डसेट व्यवसायापासून हात मोकळे करण्याचे निश्चित केले. आजवर नोकियाला तंत्रज्ञान सेवा पुरविणाऱ्या अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्टकडूनच हा ७.२ अब्ज डॉलरचा ताबा व्यवहार पूर्ण केला जाणार आहे.फिनलॅण्डची नोकिया आणि अमेरिकेची मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्या मोबाइल आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात क्रमांक एकच्या स्थानावर आहेत. दातृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानावरच नोकियाच्या विविध मोबाइलच्या कार्यप्रणाली सुरू आहे. असे असूनही केवळ स्मार्टफोन क्षेत्रात उशिरा उतरल्याचा फटका नोकियाला गेल्या काही वर्षांमध्ये बसू लागला. यामुळे कंपनीच्या अढळ स्थानाला अॅपल आणि सॅमसंगने सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे नोकियाच्या मोबाइल हॅण्डसेटची विक्री प्रचंड प्रमाणात रोडावू लागली.
मायक्रोसॉफ्टबरोबर नोकियाची गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. यासाठी मायक्रोसॉफ्टकडून अधिक आकर्षक तंत्रज्ञानाच्या अपेक्षेत नोकिया होती. अखेर हॅण्टसेट व्यवसाय विकूनच नोकियाला समाधान मानावे लागले आहे. यानुसार हा व्यवसाय मायक्रोसॉफ्टला ७.२ अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार (प्रतिडॉलर ६८ रुपये प्रमाणे) ४८,९६० कोटी रुपयांना विकण्यात आला. नोकियाची ही सावरण्याची अखेरची धडपड ठरली आहे. नव्या व्यवहारामुळे उलट मायक्रोसॉफ्टला नोकियासाठी अधिक चांगले तंत्रज्ञान पुरविता येईल. यामुळे स्पर्धक गुगलला मायक्रॉसॉफ्टला मात देता येईल. गुगलने नुकताच मोटोरोला हा मोबाइल व्यवसाय ताब्यात घेतला आहे. गुगलचे अॅण्ड्रॉइड तंत्रज्ञान नोकियाच्या अनेक स्पर्धक मोबाइल कंपन्यांमार्फत अवलंबिले जाते.
वर्षभरात निवृत्त होऊ पाहणारे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह बाल्मर यांच्या मार्गदर्शनाखाली नोकियाचा हा व्यवहार एक यशस्वी टप्पा मानला जात आहे. सहा वर्षांपूर्वी तब्बल ४० टक्के बाजारहिश्शासह मोबाइल हॅण्डसेट क्षेत्रात वर्चस्व असलेल्या नोकियाचे हे प्रमाण १५ टक्क्यांच्याही खाली गेले आहे; तर उशिराने शिरकाव केलेल्या मात्र आशाद्वारे यश संपादित केलेल्या कंपनीचा स्मार्टफोनमधील हिस्सा अवघा ३ टक्क्यांवरच आहे. मोबाइल हॅण्डसेट व्यवसाय मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात दिल्यानंतर नोकिया आता नेटवर्क, नेव्हिगेशन आदी क्षेत्रांत कायम राहणार आहे. नव्या व्यवहारानंतर नोकिया केवळ नेटवर्कमध्ये अग्रस्थानी राहणार असून मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअरसह हार्डवेअरमध्येही जगातील पहिली कंपनी बनणार आहे. नोकियाचे जगभरातील ३२ हजार कर्मचारीदेखील मायक्रोसॉफ्टच्या खिडकीत विसावणार आहेत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा