तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कंपनी मायक्रोसॉफ्टने आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्मचारी कपात जाहीर केली जाणे अपेक्षित आहे. भारतीय वंशाचे मुख्याधिकारी सत्या नाडेला यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर योजलेल्या संरचनात्मक फेरबदलांतर्गत घेतला जाणारा हा महत्त्वाचा निर्णय ठरेल.
यापूर्वी मायक्रोसॉफ्टच्या इतिहासात सर्वाधिक कर्मचारी कपात ही २००९ सालात जागतिक वित्तीय अरिष्टाच्या पाश्र्वभूमीवर केली गेली. त्या वर्षी जगभरातून ५,८०० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला होता. गेल्या आठवडय़ात ३,१०० कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्तीचे पत्र दिल्यानंतर सत्या नाडेला यांनी जुलै महिन्यात आणखी मोठे फेरबदल केले जाण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार येथील स्थानिक वृत्तपत्रांनी वर्षभरात १८ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसविले जाण्याचे कयास बांधले आहेत. कंपनीच्या एकूण मनुष्यबळातील ही १४% कपात ठरेल.
मायक्रोसॉफ्टच्या जगभरात फैलावलेल्या व्यवसायात एकूण कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल १,२५,००० असून २००९ मध्ये करण्यात आलेली ५,८०० इतकी कर्मचारी कपात त्या तुलनेत खूपच किरकोळ ठरेल. त्यामुळे यंदा होणारी कपात ही त्यापेक्षा निश्चितच जास्त असू शकेल, असेही अंदाज वर्तविले जात आहेत.
कर्मचाऱ्यांच्या कपातीचे मायक्रोसॉफ्टचे संकेत
तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कंपनी मायक्रोसॉफ्टने आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्मचारी कपात जाहीर केली जाणे अपेक्षित आहे.

First published on: 18-07-2014 at 01:34 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microsoft to cut 18000 jobs this year