भारतात उद्योग सुरू करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालून काम करू व उद्योग स्थापन करण्यास स्थिती अनुकूल करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ह्य़ुंदाई कंपनीचे सध्या भारतात दोन प्रकल्प असून आणखी दोन प्रकल्प सुरू केले जातील असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोदी यांना दिले आहे.
सोल येथे कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे त्यांनी सांगितले की, भारतातील करप्रणाली पारदर्शक व निश्चित राहील, पायाभूत सुविधा, थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातील उद्योगांना वेगाने परवाने दिले जातील. दक्षिण कोरियाच्या लोकांनी भारतात येऊन बदल अनुभवावा, वेळ पडली तर परिस्थिती आणखी सुधारण्यासाठी काम करण्याची आपली तयारी आहे.
भारत ही संधींची क्षमता असलेली भूमी आहे असे सांगून ते म्हणाले की, आपण आपल्या सरकारच्या वतीने देशातील स्थिती बदलली असल्याची ग्वाही देतो. एकूण २१ मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाणी, वाहतूक, रेल्वे, बंदरे, वीज, शाश्वत ऊर्जा, माहिती व तंत्रज्ञान, सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम या सर्व क्षेत्रात भारतामध्ये संधी आहेत असे सांगून मोदी म्हणाले की, आम्हाला उत्पादन क्षेत्रात प्रगती करून तरुणांसाठी रोजगार निर्माण करायचे आहेत. जागतिक स्पर्धात्मक वातावरण तयार झाल्याशिवाय भारतात थेट परदेशी गुंतवणूक येणार नाही त्यामुळे उद्योग सुरू करण्यास अनुकूल वातावरण तयार करण्याच्या पातळीवर आम्ही आक्रमक पद्धतीने काम करीत आहोत. कोरियन उद्योगांनी माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद निर्मिती, रेल्वे व जहाज बांधणी, गृहनिर्माण या क्षेत्रात सहकार्य करावे, त्यासाठी एक व्यवस्था निर्माण करण्यात आली असून त्याला कोरिया प्लस असे नाव देण्यात आले आहे. मोदी यांनी ह्य़ुंदाई, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, पॉश्को, एलजी व इतर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी व्यक्तिगत चर्चा केली.
उद्योगांसाठी आणखी अनुकूल वातावरणाची पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
भारतात उद्योग सुरू करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आपण व्यक्तिगत लक्ष घालून काम करू व उद्योग स्थापन करण्यास स्थिती अनुकूल करू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
First published on: 20-05-2015 at 06:36 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi assures hyundai to provide good environment for business