भांडवली बाजारात निर्देशांकांनी उच्चांकांबाबत विक्रमी अवतार धारण केला असताना, या तेजीचा कृपाप्रसाद काही मोजक्या समभागांच्या वाटय़ाला आलेला दिसून येत आहे. विशेषत: विद्यमान लोकसभा निवडणुकांचा कौल हा भाजपच्या नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसविणारा असेल या अनुमानातून गुजरातस्थित अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग तेजीचे सुस्पष्ट प्रणेते ठरले आहेत. तर ८०० ते ९०० दरम्यान घुटमळणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने तीन वर्षांपूर्वीचे भाव-वैभव कमावले आहे.
सात महिन्यांपूर्वी भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून अदानी समूहातील ‘अदानी एंटरप्राइजेस’ समभागाचा भाव तब्बल १७० टक्क्य़ांनी फुगला आहे. गुरुवारच्या शेअर बाजारातील व्यवहारात तब्बल २५.२ टक्क्य़ांनी उसळून त्याने ४७८.२० असा नवीन वार्षिक उच्चांक बनविला. याच समूहातील ‘अदानी पोर्ट्स अॅण्ड सेझ’ तसेच ‘अदानी पॉवर’ या समभागांचे भावही अनुक्रमे ११.४ टक्के आणि ६ टक्के असे वधारले.
मुकेश अंबानीप्रणीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागाने सरलेल्या महिन्यात ९०० रुपयांचा अडथळा पार करून, तीन वर्षांत प्रथमच १००० रुपयांच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. गुरुवारी बाजारात (एनएसई) झालेल्या व्यवहारात रिलायन्सने ९७४ रु. अशा तीन वर्षांपूर्वीच्या उच्चांकाला गाठले. दिवसअखेर हा समभाग ९६९.०५ रुपयांवर स्थिरावला.
बाजारातील ‘मोदी हर्षां’चे अदानीचे समभाग लाभार्थी
भांडवली बाजारात निर्देशांकांनी उच्चांकांबाबत विक्रमी अवतार धारण केला असताना, या तेजीचा कृपाप्रसाद काही मोजक्या समभागांच्या वाटय़ाला आलेला दिसून येत आहे.
First published on: 11-04-2014 at 12:53 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi harsh helps out to market