सरकारचा जुलैमध्ये सादर झालेला पहिला अर्थसकंल्प तसेच रद्द करण्यात आलेला जागतिक व्यापार परिषदेबरोबरचा करार यावर अर्थतज्ज्ञ  या नात्याने अरविंद सुब्रमण्यम यांनी व्यक्त केलेली नापसंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच लक्षात ठेवली असून, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून  त्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही नावे सुचवावीत, असे त्यांच्याकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाला सूचित करण्यात आले असल्याचे कळते.
मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून अमेरिकास्थित अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच खुद्द पंतप्रधानांनी मात्र या पदासाठी अधिक नावांची स्पर्धा निर्माण केली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नव्या नावांची यादी सादर करावी, असे आदेश पंतप्रधानांनी संबंधित खात्याला दिले आहेत.
मुख्य आर्थिक सल्लागार हे पद गेल्या एक वर्षांहून अधिक कालावधीपासून रिक्त आहे. माजी अर्थ सल्लागार डॉ. रघुराम राजन यांची सप्टेंबर २०१३ मध्ये भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, या पदावर तेव्हापासून कोणाचीही नेमणूक केली गेलेली नाही. त्यातच राजन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर राहिलेल्या सुब्रमण्यम यांचे नाव या पदासाठी चर्चेत आले.
मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे आजारपणामुळे गेले महिनाभर खात्याचा कार्यभार हाताळू न शकल्याने अर्थ सल्लागाराची नियुक्तीही रखडली होती. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची तयारी सुरू असतानाच पंतप्रधानांनी या पदासाठी अधिक नावे सुचविण्यास अर्थ मंत्रालयाला सांगितले आहे. जेटली यांनी सादर केलेल्या मध्यान्ह अर्थसंकल्पासह सत्तेवर येताच अगदी अखेरच्या क्षणी केंद्र सरकारने रद्द केलेल्या जागतिक व्यापार संघटनेबरोबरचा करार रद्द करण्याच्या निर्णयावर सुब्रमण्यम यांनी नापसंती व्यक्त केली होती. हे लक्षात घेऊनच त्यांच्याऐवजी अन्य नावाची शिफारस व त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना पंतप्रधानांनी केल्याचे मानले जाते.

Story img Loader