पारंपरिकरीत्या भारतीयांकडून दिवाळीचा मुहूर्त साधून होणाऱ्या सोने खरेदीला यंदा वेगळी धाटणी असेल, अशी तयारी केंद्र सरकारकडून करण्यात आली असून, दिवाळीच्या तोंडावर येत्या गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशोक चक्र असलेल्या ‘भारतीय सुवर्ण नाणे’ आणि अन्य तीन सोने गुंतवणूक योजनांची विधिवत घोषणा करणार आहेत.
भारतीयांची सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रचंड मोठय़ा आयात खर्चाचा भार हलका करण्यासाठी सोने मुद्रीकरण योजना आणि प्रत्यक्षात सुवर्ण धातूऐवजी, सोन्याप्रमाणे अक्षय्य मूल्यवृद्धी असलेल्या सुवर्ण रोखे योजनेचेही पंतप्रधान अनावरण करतील. नवीन सुवर्ण नाणी ही ५ ग्रॅम व १० ग्रॅम वजनाची तर २० ग्रॅमचे सुवर्ण पदक विक्रीला खुले होतील. प्रारंभी अनुक्रमे १५ हजार, २० हजार नाणी आणि ३,७५० पदके एमएमटीसी या सरकारी कंपनीकडून बाजारात येतील.
एक सुवर्ण रोखे: प्रति ग्रॅम २,६८४ रुपयांना
सुवर्ण रोखेही गुरुवारपासून २० नोव्हेंबपर्यंत विक्रीला खुले होतील. प्रत्येक रोखा (एक ग्रॅम वजनाला समकक्ष) २,६८४ रुपये किमतीला बँका व टपाल कार्यालयांतून विकला जाईल. किमान २ ग्रॅम ते कमाल ५०० ग्रॅम इतकी गुंतवणूक प्रत्येकी करता येईल. आठ वर्षे मुदतीच्या या रोख्यांवर २.७५ टक्के दराने व्याज दरानुसार परतावा दिला जाईल, जो कर पात्र असेल.