वायुदराच्या किमतीतील नियोजित १ एप्रिलपासून वाढीच्या निर्णयावर सरकार ठाम असून, माघारीचा प्रश्न उद्भवत नाही, असे केंद्रीय तेल व नैसर्गिक वायूमंत्री वीरप्पा मोईली यांनी प्रतिपादन केले. या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्यासह इतरांवर पोलिसांत दाखल केलेला गुन्हा ‘घटनाबाह्य़’ असल्याचाही त्यांनी दावा केला.
सार्वजनिक तसेच खासगी वायू उत्पादकांना त्यांच्याकडून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूसाठी किंमत वाढवून देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय हा रीतसर शासन प्रक्रियेतून पार पडला आहे. त्यामुळे त्यावर माघारीचा प्रश्नच उद्भवत नाही, असा मोईली यांनी पत्रकारांशी बोलताना पुनरुच्चार केला. प्रति ब्रिटिश थर्मल युनिट वायूसाठी सध्याच्या ४.२ अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १ एप्रिलपासून ८.४ डॉलर अशी दुपटीने किंमत मोजण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने दोनदा चर्चा करून मंजुरी दिली आहे. सरकारद्वारे नियुक्त तज्ज्ञ समितीच्या शिफारशींचेच हे फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचे कृत्य हे राज्य घटनेने घालून दिलेल्या संघराज्यीय तत्त्वालाच हरताळ फासणारे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांची आपल्याविरुद्धची पोलिसांतील तक्रार म्हणजे अधिकारांचा घटनाबाह्य़ वापर करण्याचा त्यांचा अट्टहासच दाखवून देतो. किंमतवाढीचा लाभ हा रिलायन्स इंडस्ट्रीज या खासगी कंपनीसह ओएनजीसी या सरकारी कंपनीला सारखाच लाभ होणार असल्याची त्यांनी पुष्टी जोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा